टाटा मोटर्स, ह्य़ुंदाई, मारुतीकडून सूट-सवलत, तर होंडाकडून किंमतवाढ

मुंबई : आगामी सणोत्सवाच्या तोंडावर वाहन कंपन्यांनी त्यांच्या विविध वाहनांवर सूट, सवलत देऊ  केली आहे. मात्र त्याचबरोबर काही कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमतीही वाढविल्या आहेत.

वाहन कंपन्यांसाठी मान्सून एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दरम्यान ग्राहकांकडूनही वाहनांसाठी मागणी वाढते. उन्हाळ्यातील गुढीपाडवा तसेच दिवाळीपूर्वीचा दसरा हा वाहन निर्मिती कंपन्यांसाठी विक्रीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतो. मान्सूनमध्ये शेतीसाठी उपयुक्त ट्रॅक्टरनाही मागणी असते. महिंद्र अँड महिंद्रसारख्या कंपन्यांची तर त्यावर अधिक मदार असते.

यंदाच्या मान्सूनमध्ये वाहन निर्मिती कंपन्यांनी रोख सवलत देऊ  केली आहे. ह्य़ुंदाई मोटर इंडियाने थेट ९०,००० रुपयेपर्यंत लाभ देऊ  केले आहेत. तिच्या इऑन, एलिट २०, ग्रँड आय १० या कारवर तसेच कंपनीच्या सेदान क्षेत्रातील वाहनांवर ही सूट आहे.

मारुती सुझुकीनेही तिच्या व्हॅगन आरसारख्या वाहनांवर एक लाख रुपयेपर्यंत सवलत दिली आहे. त्याचबरोबर टाटा मोटर्सने संपूर्ण जुलै महिन्यात टिगोर, नॅनो, हेक्झा, सफारी स्ट्रॉम आणि झेस्ट या मॉडेल्ससाठी पहिल्या वर्षांचा विमा हप्ता केवळ एक रुपयाला देऊ  केला आहे, तर निवडक मॉडेल्सवर २०,००० ते ३०,००० रुपयांच्या सवलतीचा लाभही ग्राहकांना देऊ केला आहे.

त्या उलट, जपानी वाहन उत्पादक होंडा कार्स इंडियाने तिच्या विविध गटांतील वाहनांच्या किमती मात्र १०,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत वाढविल्या आहेत. कंपनीने १ ऑगस्टपासून वाढत्या सीमाशुल्क तसेच वाहतूक खर्चापोटी ही किंमतवाढ असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरलेला जून महिना पावसाळा तोंडावर असतानाही प्रवासी वाहन विक्रीसाठी बहारदार राहिला. जूनमधील एकूण प्रवासी वाहन विक्रीने दशकातील सर्वोत्तम पातळी गाठत, मागच्या वर्षांच्या तुलनेत तब्बल ३७.५४ टक्कय़ांनी वाढ नोंदविली आहे.

व्यापारी वाहने गेल्या महिन्यात ४१.७२ टक्कय़ांनी वाढून ८०,६२४ झाली आहेत. जून २०१८ मध्ये सर्व गटातील मिळून एकूण विक्री २५.२३ टक्कय़ांच्या वाढीसह २२.७९ लाख झाली आहे. पहिल्या तिमाहीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत १८.०१ टक्के वाढ होत ती ६९.४२ लाखांवर गेली आहे. तर निर्यात २६.७३ टक्कय़ांनी झेपावत ११.९४ लाख झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे जून महिन्यात प्रवासी वाहनांची निर्यात मात्र ७.३७ टक्कय़ांनी कमी होत १.६७ लाख पातळीवर आली आहे.