मारुती, महिंद्रकडून उत्पादनाला कात्री

नवी दिल्ली : विक्रीतील घसरण आणि रोजगार कपातीचा सामना करावे लागलेल्या देशातील वाहन उद्योगावर ग्राहकांकडून होणाऱ्या खरेदीअभावी निर्मिती कमी करण्याची वेळही ओढविली आहे. गेल्या चार महिन्यांत केवळ प्रवासी वाहनांची निर्मितीच १३.१८ टक्क्यांनी कमी झाली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जुलैदरम्यान प्रवासी गटातील वाहनांची निर्मिती १३.१८ टक्क्यांनी कमी झाल्याचे वाहन निर्मिती संघटना ‘सिआम’ने म्हटले आहे. मागणी नसल्याने गेल्या काही दिवसांमध्ये मारुती, महिंद्रसह अनेक कंपन्यांनी निर्मिती कपात जाहीर केली आहे.

गेल्या चार महिन्यांत केवळ ह्य़ुंदाई मोटर इंडिया, फोक्सव्ॉगनसारख्या निवडक कंपन्यांच्या वाहन निर्मितीत वाढ नोंदली गेली आहे. तर मारुती सुझुकी, होंडा कार्स इंडिया, फोर्ड, टोयोटा किर्लोस्कर महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स यांना तब्बल ३० टक्क्यांपर्यंतच्या घसरणीला सामोरे जावे लागले.

एप्रिल ते जुलै २०१९ दरम्यान प्रवासी वाहन विक्री निर्मिती १३.१८ टक्क्यांनी घसरून १२,१३,२८१ झाली आहे. यामध्ये मारुतीची विक्री १८.०६ टक्क्यांनी कमी होत ५,३२,९७९ नोंदली गेली आहे. तर महिंद्रच्या निर्मितीत १०.६५ टक्के घसरणीसह ८०,६७९ वाहनांची निर्मिती झाली आहे. टाटा मोटर्सची निर्मिती २०.३७ टक्क्यांनी रोडावत ५९,६६७ झाली आहे.

निर्यात क्षेत्रात आघाडी असलेल्या ह्य़ुंदाई मोटरने गेल्या चार महिन्यांत वाहन निर्मितीतील १.७७ टक्के वाढ राखली आहे. कंपनीने या दरम्यान २,३९,६७१ वाहनांची निर्मिती केली. तर फोक्सव्ॉगनची वाहन निर्मिती १.०५ टक्क्याने वाढून ३६,९२९ झाली आहे.

दुचाकी गटातही निर्मिती कमी झाली असून एप्रिल ते जुलैदरम्यान ती ९.९६ टक्क्यांनी घसरत ७८,४५,६७५ झाली आहे. या गटात हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया, टीव्हीएस मोटर, रॉयल एनफिल्ड यांना या दरम्यान वाहन निर्मिती कमी करावी लागली. बजाज ऑटोने ४.४७ टक्के वाहन निर्मिती करत १३,८९,३९६ वाहने तयार केली.

कमी मागणीमुळे वाहन निर्मितीत कपात करावी लागल्याने या क्षेत्राला १५,००० रोजगार कपात करावी लागली आहे. तर देशभरातील ३०० वाहन विक्री दालने गेल्या काही महिन्यांमध्ये बंद झाली असल्याचे समोर आले आहे.