पीटीआय, नवी दिल्ली

कर्मचारी कपात, विक्री दालनांची संख्या कमी करणे, उत्पादनाला कात्री वगैरे नंतर आता देशातील वाहन उद्योगाने प्रकल्पच काही दिवसांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचे धोरण अनुसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच्या बाजारातील मागणीअभावी वाहन निर्मिती कंपन्यांना हे पाऊल नाइलाजास्तव उचलावे लागले आहे.

वाहन उद्योग क्षेत्राने जुलैमध्येमध्ये १९ वर्षांतील नीचांकी विक्री नोंदविली आहे. चढा कर भार, अनिवार्य विमा तसेच इंजिनासाठी अद्ययावतता यामुळे किमती वाढल्याने मागील सलग नऊ महिन्यात विविध गटांतील वाहन विक्री रोडावली आहे.

दुचाकी निर्मितीत आघाडीच्या हीरो मोटोकॉर्पने कंपनीचे वाहन निर्मिती प्रकल्प चार दिवस बंद असतील, असे स्पष्ट केले आहे. वाहनांसाठी सध्या असलेली मागणीची स्थिती आणि वाहनांची विद्यमान उपलब्धता पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. चालू महिन्यातील लागून आलेल्या सुटय़ादरम्यानच कंपन्यांची वाहन निर्मिती तात्पुरती थंडावलेल्या स्थितीत राहिली आहे.

यापूर्वी मारुती सुझुकीनेही तिच्या उत्तर भारतातील प्रकल्पात काही दिवस वाहन निर्मिती न करण्याचे निश्चित केले होते. ह्य़ुंदाई इंडिया व फोक्सव्ॉगन वगळता इतर जवळपास सर्वच कंपन्यांनी वाहन निर्मितीतील कपात जाहीर केली आहे. बॉश या वाहनांसाठीच्या सुटे भाग निर्मिती समूहाने महिन्याच्या सुरुवातीलाच तिच्या दोन प्रकल्पांतील निर्मिती १३ दिवसांसाठी बंद असेल, असे जाहीर केले होते.

टाटा मोटर्सनेही काही दिवसांपूर्वीच तिच्या पुणेनजीकच्या प्रकल्पात कमी प्रमाणातील वाहन निर्मिती करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी केली. तर महिंद्र अँड महिंद्रने चालू तिमाहीत ८ ते १० दिवस वाहन निर्मिती बंद असेल, असे गेल्याच आठवडय़ात स्पष्ट केले.

वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या लुकास-टीव्हीएसने तर कर्मचाऱ्यांसाठी सक्तीची सुटीच जाहीर केली आहे. गेल्या महिन्याप्रमाणेच चालू महिन्यातही दोन दिवस कंपनीच्या निर्मिती प्रकल्पात काम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनी दुचाकी तसेच तीन चाकी वाहन निर्मितीतील आघाडीच्या टीव्हीएस मोटरची उपकंपनी असून तिला सुटे भाग पुरविते. त्याचबरोबर समूहाची सुंदरम-क्लेटनने तिच्या तमिळनाडूतील प्रकल्पात दोन दिवस वाहन निर्मिती होणार नाही, असे स्पष्ट केले.

‘मारुती’तील ३,००० कंत्राटी कामगार बेरोजगार

नवी दिल्ली : खरेदीदारांनी पाठ केल्याने काही दिवस वाहन निर्मिती बंद ठेवावी लागलेल्या प्रवासी वाहनांच्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने तिच्या ३,००० कंत्राटी कामगारांना नारळ दिला आहे. कंपनीतील तात्पुरत्या स्वरूपातील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे करार संपले असून त्यांचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत कंपनीतील ३,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रोजगार गमाविल्याचेही भार्गव म्हणाले. वाहन क्षेत्रातील मंदीमुळे तात्पुरत्या सेवेतील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असून कंपनीतील कायम तत्त्वावरील कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, असे भार्गव यांनी स्पष्ट केले. मागणीप्रमाणे कर्मचारी भरती वा कपातीचे धोरण अनुसरले जाते, असेही ते म्हणाले.