इंडिगो, स्पाइसजेटने प्रवासाकडे सर्वाधिक ओढा

देशांतर्गत हवाई प्रवासात सरलेल्या ऑक्टोबरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. पर्यटन हंगामाची चाहूल तसेच असहय़ उकाडय़ांपासून दिलासा म्हणून या महिन्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढून ७०.३९ लाखांवर गेली. स्वस्त दरातील हवाई सेवा असलेल्या इंडिगो आणि स्पाइसजेट यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर राहत या काळात बाजी मारल्याचे दिसून आले.
नागरी उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए)ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गतवर्षांतील ऑक्टोबरमधील ५९.२५ लाख हवाई प्रवासी संख्येच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरने गाठलेला ७०.३९ लाखांचा टप्पा हा १९ टक्क्य़ांची दणदणीत वाढ दाखविणारा आहे.
अलीकडे बाजारात सूचिबद्ध झालेल्या इंडिगोने यापैकी २५.९० लाख प्रवाशांची ने-आण करून सर्वाधिक ३६.८ टक्के बाजारहिस्सा राखत आपले अग्रस्थानही कायम राखले आहे. त्याखालोखाल सर्वोत्तम ९३ टक्के प्रवासी भार घटक असलेल्या स्पाइसजेटच्या सेवेचा उपभोग घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती. उल्लेखनीय म्हणजे स्पाइसजेटने सलग सहाव्या महिन्यात आपला भार घटक अर्थात प्रति विमान व्यापली जाणारी आसनसंख्या ९० टक्क्य़ांहून अधिक राखला आहे. स्पाइसजेटचा ऑक्टोबरमधील बाजारहिस्सा १२.८ टक्के राहिला आहे.