एम. टी. पाटील बिल्डर्स अ‍ॅण्ड काँट्रॅक्टर प्रा. लि. चे मुख्य महाव्यवस्थापक अविनाश पाटील यांची बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) अध्यक्षपदी सर्वसहमतीने निवड झाली आहे. ते २०१७ पर्यंत असोसिएशनची धुरा सांभाळतील. गुरुवारी झालेल्या शानदार समारंभात असोसिएशनचे मावळते अध्यक्ष व विश्वस्त आर. राधाकृष्णन यांच्याकडून त्यांनी बीएआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

‘बीएआय’ च्या देशभरात १५३ शाखा असून या उद्योग क्षेत्रातील तब्बल १६ हजार तिचे सदस्य आहेत. त्याशिवाय विभागीय संघटनांचे एक लाख सदस्यही ‘बीएआय’शी संबंधित आहेत. अर्थव्यस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या या उद्योगक्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे नियोजनकर्त्यांचे आणि संबंधित प्राधिकरणांचे लक्ष वेधण्यासाठी ‘बीएआय’ प्रयत्नशील आहे. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर अविनाश पाटील यांनी नाशिकस्थित बांधकाम क्षेत्रातील कुटुंबाचा वारसा हाती घेतला. पाटील हे नाशिकमधील ‘बीएआय’चे संस्थापक सदस्य आहेत.