देशातील विमा व्यवसायातील आपला हिस्सा ब्रिटनची अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड कंपनी दुपटीवर नेणार आहे. याबाबतच्या कंपनीच्या प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाने नुकतीच मान्यता दिली.
अविवा लाइफ इन्शुरन्स कंपनी या भारतातील जीवन विमा कंपनीत ब्रिटनस्थित अविवाचा २६ टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित मालकी डाबर इन्व्हेस्ट कॉर्पोरेशनची आहे. अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड ही अविवा लाइफ इन्शुरन्स कंपनी इंडियातील आपला हिस्सा अतिरिक्त २३ टक्क्य़ांनी वाढवून तो ४९ टक्क्य़ांपर्यंत नेणार आहे.
अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्जचा ब्रिटनव्यतिरिक्त अन्य देशांमधील विमा व्यवसायांमध्ये भागीदारीतील व्यवसाय आहे. यामध्ये भारतासह इंडोनेशिया, तैवान, व्हिएतनाम, आयर्लन्ड आदींचा समावेश आहे. भारतात विमा व्यवसायात विदेशी कंपनीला ४९ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक करण्यास मुभा आहे.