मुंबई : देशातील तिसऱ्या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने कर्मचाऱ्यांना जन्मजात प्राप्त लिंगापेक्षा भिन्न लिंगभाव व लैंगिक अभिव्यक्ती ठेवण्याला मान्यता देणारे पाऊल टाकले असून, शिवाय ग्राहकांना त्यांच्या बचत अथवा मुदत ठेव खात्यात ‘लिंग’निरपेक्ष असे नावापुढे  श्री (मिस्टर) अथवा श्रीमती (मिसेस) संबोधनाऐवजी ‘एमएक्स’ असा अतिरिक्त पर्याय दिला आहे.

भारतात समलैंगिकतेला अपराधमुक्त ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाला सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली, त्याचेच निमित्त साधून अ‍ॅक्सिस बँकेने या अभिनव पावलांची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. कामाच्या ठिकाणी विविधता, समानता आणि समावेशकता असे ब्रीद घेऊन अ‍ॅक्सिस बँकेने ‘एलजीबीटीक्यूआयए’ समुदायातील कर्मचारी आणि ग्राहकांना अनुकूल धोरणांची कास धरणारी अ‍ॅक्सिस बँक ही वित्तीय सेवा क्षेत्रातील पहिलीच संस्था आहे. मनुष्यबळ आघाडीवर बँकेने कर्मचाऱ्यांना त्यांचे लिंग, लैंगिकता आणि वैवाहिक स्थिती विचारात न घेता, आरोग्य विम्याच्या (मेडिक्लेम) लाभासाठी कोणाही भागीदाराचे नाव नोंदविण्यास परवानगी देणारे पाऊल टाकले आहे. येत्या २० सप्टेंबरपासून या निर्णयांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

अ‍ॅक्सिस बँकेने ग्राहकांना समान लिंग असणाऱ्या भागीदारासोबत संयुक्त बचत आणि मुदत ठेव खाते उघडण्याचीही परवानगी दिली आहे.