एकीकडे देशाचे अर्थमंत्री विदेशातील गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर पडत असल्याची ग्वाही देत असतानाच, मुंबईत देशातील खासगी क्षेत्रातील तिसऱ्या मोठय़ा बँकेने वर्षांतील सर्वात मोठय़ा खासगी तत्त्वावरील भागविक्रीला दमदार सुरुवात करून, संस्थागत देशी-विदेशी गुंतवणूकदारवर्गाची देशाबद्दलच्या विश्वासार्हतेची प्रत्यक्षात पावतीही दिली.
अ‍ॅक्सिस बँकेच्या एकूण १०० कोटी समभागांच्या विक्रीपैकी या टप्प्यात तीन कोटी ९० लाख समभागांची विक्री होणार असून, ‘सेबी’कडे नोंद असलेल्या गुंतवणूक संस्थांनाच या भागविक्रीत सहभागी होता येणार आहे. ‘सेबी’ने भागविक्रीची प्रति समभाग रु. १३९८.५६ अशी आधार किंमत निश्चित केली आहे. या भागविक्रीतून एकूण रु. ५,५४६ कोटी उभारले जाणार आहेत. ३ कोटी ४० लाख समभाग पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना तर ५० लाख समभागांचे वाटप हे प्रवर्तक या नात्याने आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)साठी राखीव ठेवले गेले आहे.
‘सेबी’ने ठरविलेल्या आधार किंमतीपेक्षा ०.६१ टक्क्यांनी कमी दराने म्हणजे प्रति समभाग रु. १३९० या किमतीला अ‍ॅक्सिस बँकेने सुरू केली आहे. भागविक्रीची प्रक्रिया १ फेब्रुवारी रोजी पूर्ण केली जाणार आहे.
या आधी बँकेने ९.१५% व्याजदराच्या १० वर्षे मुदतीच्या रोख्यांचे वाटप पूर्ण करून रु. २५०० कोटी उभारले आहेत. बँकेने ३१ डिसेंबर २०१२ रोजी संपलेल्या तिमाहीत एकूण उत्पन्नात १९.०६% वाढ दर्शवीत रु. ८५८०.३० कोटींचे उत्पन्न मिळविले तर निव्वळ नफ्यात २२.२२% वाढ नोंदवत रु. १३४७.२२ कोटींचा नफा कमावला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांकात उतरंड झाली असली तरी अ‍ॅक्सिस बँकेच्या समभागाने मंगळवारी रु. १,५०३ चा सार्वकालिक उच्चांक गाठला. दिवसअखेर  कालच्या तुलनेत ४.३० टक्क्यांची म्हणजे ६०.८५ रु. वर तो १४७५.७५ वर बंद झाला.