वस्त्रोद्योग, सिमेंट तसेच शिक्षण, सामाजिक कार्य क्षेत्रातील बिर्ला समूहाच्या कार्याचे प्रणेते बी. के. ऊर्फ बसंत कुमार बिर्ला यांचे बुधवारी येथे वार्धक्याने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला हे बी. के. बिर्ला यांचे नातू आहेत. तर पहिल्या पिढीचे उद्योगपती घनश्याम दास बिर्ला यांचे ते सर्वात लहान पुत्र होते. बी. के. बिर्ला यांचे पुत्र आदित्य विक्रम बिर्ला यांचे १९९५ मध्ये निधन झाल्यानंतर व्यवसायाची जबाबदारी त्यांच्या दोन कन्या मंजुश्री खेतान व जयश्री मोहता यांच्यावर सोपविण्यात आली.

बी. के. बिर्ला सेंच्युरी टेक्सटाईल अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. केसोराम इंडस्ट्रीजचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. वयाच्या १५ व्या वर्षीच व्यवसायात रुजू झाले. सेंच्युरी एंका, जयश्री टी आदी व्यवसायाचा त्यांनी विस्तार केला होता. राजस्थानमधील पिलानी, पुण्यातील कला व व्यवस्थापन, दिल्लीतील व्यवस्थापन तंत्रज्ञान तसेच कोलकातातील शालेय शिक्षण क्षेत्रातील संस्था त्यांनी स्थापन केल्या आहेत.

बिर्ला यांचे पार्थिव कोलकाता येथील बिर्ला पार्कमध्ये ठेवण्यात येणार असून गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, बिर्ला यांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर दक्षिण मुंबईतील बिर्ला इमारतीतील व्यवहार गुरुवारी बंद राहणार आहेत.