योगगुरू बाबा रामदेव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांच्या रुची सोया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अन्य कामांमध्ये अधिक व्यस्त असल्यानं हा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. १९ ऑगस्ट रोजी त्यांना तात्काळ प्रभावानं कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ते कंपनीत अकार्यकारी स्वतंत्र संचालक (नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट डिरेक्टर) म्हणून कार्यरत राहणार आहेत.

पतंजलीनं दिवाळखोरीत निघालेली रुची सोया ही कंपनी त्या प्रक्रियेअंतर्गत खरेदी केली होती. रूची सोया ही कंपनी तेल, सोयबिनचे पदार्थ आदि पदार्थांचं उत्पादन घेते. “आचार्य बाळकृष्ण यांनी व्यस्त असल्यामुळे तात्काळ प्रभावानं रुची सोया या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळानं त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पदावरून कार्यमुक्त केलं आहे.” अशी माहिती कंपनीनं मुंबई शेअर बाजाराला बुधवारी दिली.

रूची सोया या पतंजली समुहाच्या कंपनीचा नफा जून तिमाहीमध्ये १३ टक्क्यांनी कमी झाला होता. बुधवारी कंपनीकडून जून तिमाहीच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान कंपनीच्या नफ्यात १३ टक्क्यांची घट होऊन तो १२.२५ कोटी रूपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १४.०१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. जून तिमाहीमध्ये कंपनीच्या एकूण उत्पन्नातही घट झाली असून ती ३,०५७.१५ कोटी रूवये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहित कंपनीचं एकूण उत्पन्न ३,१२५. ६५ कोटी रूपये इतकं होतं.

राम भरत नवे एमडी

कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी कार्यरत असलेल्या राम भरत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बुधवारपासूनच ते या पदी रूजू झाले आहेत. रुची सोया ही कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेतून जात होती. त्यानंतर गेल्या वर्षी पतंजली आयुर्वेदनं ४ हजार ३५० कोटी रूपयांमध्ये या कंपनीची खरेदी केली होती.