गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांकडे छोटय़ा गुंतवणूकदारांना खेचून आणण्यात महत्त्वाची भूमिका राहिलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता वेगाने घसरत असून, सरलेल्या नोव्हेंबरमध्ये या माध्यमातून अवघी ७,३०२ कोटींची गुंतवणूक आली. मागील ३१ महिन्यांतील हा सर्वात कमी राहिलेला गुंतवणूक ओघ आहे. यापूर्वी यापेक्षा कमी ६,६९० कोटी रुपयांची गुंतवणूक एप्रिल २०१८ मध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून आली होती.

देशातील ४४ म्युच्युअल फंड घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ या संघटनेच्या आकडेवारीनुसार, करोनाकाळात आर्थिक वातावरण आव्हानात्मक असताना, एप्रिलपासून सहा महिने ‘एसआयपी’ गुंतवणुकीला उतरती कळा होती.

ऑक्टोबर २०२० मात्र हा ओघ वाढून ७८०० कोटी रुपयांवर गेला होता. नोव्हेंबरमध्ये तो पुन्हा घसरून, ३१ महिन्यांच्या नीचांकपदाला ७,३०२ कोटी रुपयांवर गडगडल्याचे दिसून आले.

करोना आजारसाथीच्या आधी मासिक सरासरी ८,००० कोटी रुपयांवर असणारा एसआयपी ओघ हा जून २०२० मध्ये सर्वप्रथम या पातळीखाली गेलेला दिसून आला. याचा सर्वाधिक फटका हा समभागसंलग्न (इक्विटी) फंडांना बसताना दिसत आहे. सलग पाचव्या महिन्यात इक्विटी फंडांना गळती लागल्याचे दिसून आले आणि नोव्हेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी या फंडांमधून गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण सर्वाधिक १२,९१७ कोटी रुपयांच्या घरात गेल्याचे आढळून आले.

भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टी दिवसागणिक विक्रमी उच्चांक गाठत असताना, म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून नफावसुलीचे विपर्यस्त चित्र दिसून येत आहे.

प्रत्यक्षात ३.३९ लाख खात्यांची भर

महिनाअखेरीस सलग तीन दिवस सुटीचे आल्याने, त्याचा परिणाम नोव्हेंबरमधील एकूण ओघाच्या आकडेवारीवर दिसून येत आहे, असे ‘अ‍ॅम्फी’ने स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये एसआयपी खात्यांमध्ये ३.३९ लाखांची दमदार भर पडली आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. नोव्हेंबरअखेर, दरमहा ठराविक तारखेला ठराविक रकमेसह पद्धतशीर गुंतवणुकीचा अर्थात एसआयपीचा मार्ग अनुसरणाऱ्या गुंतवणूकदार खात्यांची एकूण संख्या ३.४१ कोटींवर गेली आहे.