उद्योगांचाच कर्जथकीतात सर्वाधिक वाटा

डिसेंबर २०१७ अखेर सर्व बँकांमधील ढोबळ अनुत्पादित मालमत्तेची रक्कम ८,४०,९५८ कोटी रुपयांवर गेली आहे. यामध्ये उद्योगांकडील थकीत कर्जे सर्वाधिक रकमेची आहेत.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात याबद्दल माहिती दिली. ३१ डिसेंबर २०१७ अखेर व्यापारी बँकांच्या ढोबळ थकीत कर्जामध्ये सर्वाधिक ६,०९,२२२ कोटी रुपयांची कर्जे ही उद्योग क्षेत्रातील आहेत. बँकांमार्फत एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण २०.४१ टक्के आहे.

सेवा क्षेत्राला दिलेल्या एकूण कर्जापैकी ५.७७ टक्के कर्ज थकीत आहे. ही रक्कम १,१०,५२० कोटी रुपये आहे, तर कृषी क्षेत्राकडून ६९,६०० कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे. बिगरअन्न पतपुरवठय़ासाठीचे आणि किरकोळ कर्जाची रक्कम अनुक्रमे १४,९८६ व ३६,६३० कोटी रुपये आहे.

सर्वाधिक ढोबळ अनुत्पादित कर्जे ही देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेची आहेत. ही रक्कम २,०१,५६० कोटी रुपये आहे, तर पाठोपाठ पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, अलाहाबाद बँक, आंध्र बँक कॉर्पोरेशन बँक यांना  मोठय़ा रकमेची कर्जे येणे अपेक्षित आहे.

स्टेट बँकेची २० हजार कोटींची कर्जे निर्लेखित

*  देशातील सर्वात मोठय़ा व सर्वाधिक थकीत कर्जे असलेल्या स्टेट बँकेची २०,३३९ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी संसदेत दिली. २०१६-१७ मध्ये सर्व बँकांनी निर्लेखित केलेल्या एकूण रकमेपैकी स्टेट बँकेच्या निर्लेखित कर्जाचे प्रमाण २४.९ टक्के असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले. थकीत कर्जे आणि ती वसूल करण्यासाठीच्या प्रक्रियेकरिता राष्ट्रीय कंपनी कायदे लवाद आणि राष्ट्रीय कंपनी कायदे अपील लवादात अनुक्रमे ८,४५७ व २६४ खटले प्रलंबित असल्याचेही सांगण्यात आले.

थकीत कर्जामध्ये स्टेट बँक आघाडीवर

*  स्टेट बँक    २,०१,५६०

*  पीएनबी     ५५,२००

*  आयडीबीआय बँक    ४४,५४२

*  बँक ऑफ इंडिया     ४३,४७४

*  बँक ऑफ बडोदा     ४१,६४९

*  युनियन बँक ३८,०४७

*  कॅनरा बँक   ३७,७९४

*  आयसीआयसीआय    ३३,८९४

*  इंडियन ओव्हरसीज   ३१,७२४

*  सेंट्रल बँक   ३२,४९१

(डिसेंबर २०१७ अखेर; रक्कम कोटी रुपयांमध्ये)