व्हिडीओकॉन – आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी पाच लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने कोचर यांच्यासह या प्रकरणी अटकेत असलेले त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणूगोपाळ धूत यांच्यासह अन्य आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश ३० जानेवारीला दिले होते. त्यानुसार चंदा कोचर या शुक्रवारी न्यायालयासमोर हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. तो मंजूर करण्यात आला.

चंदा कोचर या ईडीला तपासात सहकार्य करत आहेत. महिलेला अन्य राज्यात चौकशीसाठी बोलावले जाऊ शकत नाही. असे असतानाही कोचर या ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. ईडीतर्फे त्यांना चौकशीसाठी जेव्हा बोलावल्यास त्या हजर राहतात, असे त्यांचे वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच कोचर यांना जामीन देण्याची विनंती केली. ईडीने कोचर यांना जामीन देण्यास विरोध केला. न्यायालयाने मात्र कोचर यांना पाच लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच ईडीकडे तातडीने पारपत्र जमा करण्याचे आदेश देत न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याची अट न्यायालयाने घातली. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. ईडीने कोचर यांचे पती दीपक यांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांनाही शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर धूत यांना समन्स मिळाले नसल्याने ते न्यायालयात हजर होऊ शकले नाही, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.