इजिप्तची संभाव्य निर्यातबंदी
इजिप्तच्या सरकारने बजाज ऑटोच्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या आयातीवर एका वर्षांसाठी बंदी घालण्याचे सर्वाधिकार तेथील अर्थमंत्र्यांना बहाल करण्याच्या बातमीने शुक्रवारी शेअर बाजारात या समभागाला जबर हादरे दिले. बंदीबाबतच्या निर्णयाला अद्याप मंजुरी दिली गेलेली नसली, तरी बजाज ऑटोचा समभाग ६५ रुपयांनी ढेपाळून गुरुवारच्या तुलनेत ३.४२% खाली दिवसअखेर स्थिरावला.
इजिप्तच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर बजाज ऑटोच्या पूर्ण जुळणी केलेल्या वाहनांवर आणि सुटय़ा भागांवरही तात्पुरती बंदी घालण्याचे अधिकार त्या सरकारच्या अर्थमंत्र्यांना दिल्या असल्याच्या बातमीच्या परिणामी एका मोठय़ा दलाल पेढीने आपल्या समभाग संशोधन अहवालात बजाज ऑटोची पत लगोलग कमी केली. परिणामी शुक्रवारी बाजारात या समभागाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली.
बजाज ऑटोच्या एकूण विक्रीत निर्यातीचा हिस्सा ३९ टक्के असून, त्यापैकी एकटय़ा इजिप्तचा वाटा ११ टक्केइतका असल्याने गुंतवणूकदारांकडून ताज्या घटनाक्रमाबाबत चिंता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी कंपनीची निर्यात १५ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज होता. परंतु या बंदीमुळे निर्यातीत फक्त आठ टक्क्यांची वाढ संभवते. देशांतर्गत विक्रीतील वाढही उत्साहवर्धक दिसून येत नाही, असे या दलालपेढीच्या अहवालात म्हटले आहे.
याचे विपरित पडसाद बाजारात उमटले. परिणामी शुक्रवारी १९०५ रु. भावावर उघडलेला बजाजचा समभाग १८२० पर्यंत गडगडला. बाजार बंद होताना तो काहीसा सावरून १८३९.१५ भावावर स्थिरावला.

गंभीर व्यावसायिक परिणाम
बजाज ऑटोच्या एकूण निर्यातीत इजिप्तला होणाऱ्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. इजिप्तमध्ये कंपनीच्या तीनचाकी रिक्षांची मोठय़ा प्रमाणात निर्यात केली जाते. या वाहन प्रकारात बजाज ऑटोला दुसरा स्पर्धक नसल्याने या निर्यातीतून कंपनीला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. या आधीच श्रीलंका या दुसऱ्या मोठय़ा आयातदार देशाने बजाज ऑटोच्या आयातीवर बंधने लादली आहेत. त्यातच इजिप्तकडून होणाऱ्या संभाव्य आघातातून बजाज ऑटोच्या एकूण निर्यात उत्पन्नावर आगामी काळात नकारात्मक परिणाम ठळकपणे दिसून येतो.