‘एक्झीक्युटिव्ह’ श्रेणीतील स्वतंत्र नाममुद्रा लवकरच
दुचाकी बाजारपेठेत अधिक पसंती असलेल्या एन्ट्री व स्पोर्ट्स गटातील मक्तेदारी गेल्या वर्षांतही राहिल्याचा दावा करणाऱ्या बजाज ऑटोने काहीसे मागे पडलेल्या १२० ते १५० दरम्यानच्या (एक्झीक्युटिव्ह) श्रेणीत स्वतंत्र नाममुद्राच विकसित करण्याचे निश्चित केले आहे.
बजाज ऑटोच्या मोटरसायकल श्रेणीतील व्यवसायाचा गेल्या वर्षांचा आढावा घेताना या विभागाचे अध्यक्ष एरिक वॉस यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत कंपनीने १०० सीसीच्या व १५० सीसी इंजिन क्षमतेवरील दुचाकी विक्रीत सर्वाधिक बाजारहिस्सा राखल्याचा दावा केला. गेल्या वर्षांत अवघा १२ टक्के हिस्सा मिळविणाऱ्या १०० वरील मात्र १५० सीसी क्षमतेच्या दुचाकींमुळे आता या गटावर अधिक लक्ष देण्याचे सांगण्यात आले. याचाच एक भाग म्हणून ‘डिस्कव्हर’सारखी स्वतंत्र नाममुद्राच विकसित करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
२०१५ मध्ये विविध श्रेणींमध्ये एकूण ८ दुचाकी सादर करणाऱ्या बजाज ऑटोच्या वर्षअखेरच्या अव्हेंजर एफएलजी या २०० सीसीवरील मोटरसायकललाही प्रतिसाद लाभल्याचे एरिक यांनी या वेळी सांगितले. पदार्पणात २० हजार विक्री झालेल्या या वाहनाची उत्पादन क्षमता मार्च २०१६ पर्यंत ३० हजारांवर नेण्यात येईल, असेही याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
तीनपैकी दोन श्रेणींत अव्वल असणाऱ्या कंपनींना येत्या कालावधीत मधल्या गटावरही तेवढाच भर असेल, असे नमूद करून एरिक यांनी चालू महिन्यातच या श्रेणीतील नाममुद्रा विकसित केली जाईल, असे स्पष्ट केले.
१०० सीसी क्षमतेच्या व १५० सीसी क्षमतेच्या दुचाकींचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा ४३ टक्के असून त्यात बजाज ऑटोने गेल्या वर्षांत ३६ टक्के हिस्सा राखला आहे. मात्र ११० ते १५० सीसी इंजिन क्षमतेच्या बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांमध्ये हीरो मोटोकॉर्पला कट्टर स्पर्धक व पूर्वाश्रमीची भागीदार होन्डाने मागे टाकले आहे. या श्रेणीत बजाज ऑटो स्वतंत्र नाममुद्रेद्वारे आपला जम बसवू पाहत आहे.