विजेरी वाहनाद्वारे कंपनीचा स्कूटरनिर्मितीत पुनर्शिरकाव

नवी दिल्ली : 

‘हमारा बजाज’ गुणगुणत तमाम स्कूटरप्रेमींना ७० च्या दशकात अनेक महिने प्रतिक्षा करायला भाग पाडणाऱ्या बजाज ऑटोने पुन्हा स्कूटर निर्मितीचा मार्ग अनुसरला आहे. कंपनीने आता विजेरी स्कूटरची निर्मिती करण्याचे धारिष्टय़ दाखविले असून तिच्या लोकप्रिय ‘चेतक’चे नाव नव्या गटातील वाहनासाठी निश्चित केले आहे.

कंपनीची ही विजेरी दुचाकी १.५० लाख रुपयेपर्यंतच्या घरात जाणारी असण्याची शक्यता आहे. बजाज ऑटोची ही नवी विजेरी स्कूटर सध्याच्या हीरो मोटोकॉर्प, रिव्होल्ट, कायनेटिक ग्रीनला स्पर्धा निर्माण करेल. सध्याच्या विजेरी स्कूटरच्या किंमती ६०,००० रुपयांपुढे आहेत. कंपनी तिच्या नव्या विजेरी स्कूटरची निर्मिती पुण्यानजीकच्या प्रकल्पातून करणार असून विक्रीलाही तेथूनच प्रारंभ करेल.

बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी बुधवारी याबाबतची घोषणा नवी दिल्लीत केली. राजीव यांच्याकडे दोन दशकांपूर्वी बजाज ऑटोची सूत्रे आल्यानंतर त्यांनी कंपनी केवळ मोटरसायकल निर्मिती करेल, असे जाहीर केले होते. त्यानंतर राजीव यांचे वडिल व बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी कंपनी स्कूटर तयार करणार नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

एकदा ५ तासात चार्ज केल्यानंतर बजाजची ही नवी चेतक विजेरी स्कूटर ८५ ते ९५ किलो मीटर धावेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत  बजाजच्या विजेरी दुचाकीचे अनावरण करण्यात आले.

राजीव बजाज यांनी सांगितले की, आज अनेक जण, छोटय़ा कंपन्या बॅटरी तयार करत आहेत. काही जण मोटर बनवितात. तर काही केवळ स्टील. मात्र असा सुवर्णसंगम साधण्यास बजाज ऑटो उत्सुक असून केवळ एका कळसरशी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या जोरावर सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आनंद आहे.

बजाज म्हणाले की, आज अनेक दुचाकी निर्मिती कंपन्या अशा आहेत की ज्या कालांतराने विजेरी दुचाकी निर्मितीत उतरल्या आहेत. तेव्हा त्याबाबत आमचेही भिन्न मत असण्याचे कारण नाही. भूतकाळातील विश्वासार्ह आणि वर्तमानातील आर्थिकदृष्टय़ा भक्कम कंपनी असताना आम्हीही या क्षेत्रात न उतरणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.