बजाज फिनसव्‍‌र्ह या बजाज समूहातील वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ‘सेबी’कडे म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. नऊ वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही कंपनीने या क्षेत्रात प्रवेश टाळला होता. ‘सेबी’कडे आधीपासून प्रलंबित अर्ज पाहता, आधीच भाऊगर्दी झालेल्या म्युच्युअल फंड उद्योगात आणखी किमान अर्धा डझन नवीन स्पर्धकांचा समावेश लवकरच होऊ घातला आहे.

ग्राहक सेवेत आणि व्यवसाय विस्तारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा हिरिरीने वापर करणारी कंपनी बजाज फिनसव्‍‌र्हची ओळख आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि शाखांच्या विस्तृत जाळ्याचा, कंपनीकडून प्रस्तावित म्युच्युअल फंड व्यवसायात विशेष उपयोग होईल. विशेषत: आघाडीच्या ३० शहरांचा परिघ ओलांडण्याची कंपनीची रणनीती असण्याची चर्चा फंड वर्तुळात सुरू आहे.

बजाज फिनसव्‍‌र्हने २८ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केल्याचे ‘सेबी’च्या संकेतस्थळावरून दिसून येत आहे. वित्तीय उत्पादनांत गुंतवणूक करताना नेहमीच ज्ञात नाममुद्रांना गुंतवणूकदारांची पसंती असते. साहजिकच बजाज समूहाचे पाठबळ असल्याने त्यांच्या म्युच्युअल फंडांना गुंतवणूकदारांच्या मनात स्थान निर्माण करताना अडचण येणार नाही. परंतु व्यवसाय सुरू केल्यानंतर आघाडीच्या फंड घराण्यात स्थान मिळविण्यास प्रदीर्घ काळ जावा लागेल.

यापूर्वी २०११ मध्ये बजाज फिनसव्‍‌र्हला म्युच्युअल फंडाचा व्यवसाय सुरू करण्यास ‘सेबी’ने मंजुरी दिली होती. परंतु वित्तीय सेवा क्षेत्रात जम बसविलेला बजाज समूह, मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात कधीच उतरू शकला नाही.

दाटीवाटीत नवीन भर

देशात सध्या ४० म्युच्युअल फंड घराणी कार्यरत असून, त्यांच्या एकत्रित मालमत्तेने २७ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. अलीकडेच एनजे इंडिया इन्व्हेस्ट आणि सॅम्को सिक्युरिटीजला मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘सेबी’ने तत्त्वत: मान्यता दिली आहे. बजाज फिनसव्‍‌र्हसह, झीरोधा ब्रोकिंग आणि फ्रंटलाइन कॅपिटल सव्‍‌र्हिसेस यांचे अर्ज दाखल झाले आहेत. अशा खूप दाटीवाटी असलेल्या व्यवसायात उतरू पाहणाऱ्या सुमारे अर्धा डझन अर्जावर ‘सेबी’ने अद्याप निर्णय घेतलेला नाही.