01 March 2021

News Flash

‘बॅलन्स्ड फंडां’ना पसंती

जाराचा वरच्या दिशेने प्रवास अविरत सुरू राहण्याला हीच गोष्ट साहाय्यभूत ठरली.

२०१८ सालात सुरू  राहील काय काय?

म्युच्युअल फंड उद्योगासाठी २०१७ हे एक वैशिष्टय़पूर्ण वर्ष होते. बाजारात चमकदार तेजीची लकाकी दिसली इतकेच नव्हे तर नवलाई म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनादेखील तेजीचा उचित लाभ मिळाला. १८ महिन्यांपूर्वी जो अत्यंत दूरचा पल्ला भासत होता, तो एकूण गंगाजळीतील २० लाख कोटींचा टप्पा म्युच्युअल फंड उद्योगाने भरधाव गाठला. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तात्पुरत्या नकारात्मक परिणामांतून बाजाराच्या तेजीला नख लावले जाऊ शकत होते, अशा वेळी हे घडले हे विशेषच! आपल्या तालावर बाजाराला नाचवणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांच्या ओघाला झाकू शकेल इतका देशी गुंतवणूकदारांचा ओघ ही या सर्वात उत्साहदायी बाब ठरली. बाजाराचा वरच्या दिशेने प्रवास अविरत सुरू राहण्याला हीच गोष्ट साहाय्यभूत ठरली.

वर्षभरातील प्रवास जर रंजक होता म्हटले, तर या प्रवासाला मौल्यवान सारथ्याची जोड गुंतवणूकदारांची पसंती म्हणून उदयास आलेल्या बॅलन्स्ड फंड योजनांनी मिळवून दिली. म्युच्युअल फंडांच्या सर्व योजनांमध्ये बॅलन्स्ड फंडांनी मिळविलेला ओघ याचा प्रत्यय देतो. अस्थिरतेच्या स्थितीत उपयुक्त अशा या पर्यायाबद्दल वाढती स्वीकृती उत्साहवर्धक निश्चितच! तथापि, पुढे जाऊन पाहता, बाजाराने कळस गाठला असताना २०१८ सालात गुंतवणुकीच्या निर्णयाची फेरमांडणी आवश्यक ठरेल.

बाजारातील दमदार उत्साही कल लक्षात घेता, अनेक गुंतवणूकदार जे आजवर परिघावर होते त्यांनी म्युच्युअल फंडांमार्फत समभागसंलग्न / बॅलन्स्ड योजनांमध्ये गुंतवणूक करून अखेर बाजारात प्रवेश केला. बाजारात आज ना उद्या ‘करेक्शन’ (घसरण) येईल मग गुंतवणुकीचा विचार करू अशा प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांचा पैसाही शेवटी या योजनांकडे वळला. तरी अधिकाधिक गुंतवणूकदार आजही बाजारात प्रवेशासाठी उत्सुक आहेत. विशेषत: पहिल्यांदाच समभागसंलग्न गुंतवणूक आजमावणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपल्या निर्णयाची योग्यता आणि परताव्याच्या अपेक्षा या गोष्टी ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे.

भारतीय भांडवली बाजार तेजीच्या मध्य आवर्तनात आहे म्हटले जाते, अशा समयी चार ‘सी’ ध्यानात घेऊन गुंतवणूक निर्णय घ्यायला हवा. हे ‘सी’ म्हणजे उद्योगांचा क्षमता वापर (कपॅसिटी युटिलायझेशन), उद्योगांची नफाक्षमता (कॉर्पोरेट प्रॉफिटॅबिलिटी), क्षमता विस्तार (कॅपॅसिटी एक्स्पान्शन) आणि पतपुरवठय़ातील वाढ (क्रेडिट ग्रोथ) होय. सध्या देशस्तरावर सर्वत्र या चारही निकषांवर आपल्या उद्योगांनी बहुवार्षिक तळ गाठलेला आहे. उद्योगांचा क्षमता वापर सरासरी ७० टक्क्यांवर आहे, जो २००७ सालातील तेजीच्या समयी गाठल्या गेलेल्या सरासरी ९२ टक्क्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. हीच बाब नफाक्षमतेलाही लागू होते, जिचा आलेख गेल्या चार वर्षांत सरासरी सपाटीला आहे. या दोन पैलूंवर काही वाढ दिसली तरच क्षमताविस्तार आणि पतपुरवठय़ात वाढीसाठी वाव निर्माण होईल. ही अशी लवकरच वाढ दिसेल या आशेवर बाजाराने इथवर मजल मारली हे ध्यानात असू द्यावे. कंपन्यांच्या उत्सर्जनात काहीशी वाढ बाजाराला उत्साही वळण देत राहतील, पण आगामी काळ मोठय़ा अस्थिरतेचा हे मनात पक्के असू द्यावे.

अशा समयी म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स्ड वर्गवारीचे महत्त्व अधोरेखित होते. अशा फंडांतून होणारी गुंतववणूक ही समभाग, समभागसंलग्न अन्य पर्यायांबरोबरीनेच रोखेसंलग्न पर्यायांत होत असते. त्या त्या समयी कोणत्या पर्यायातील गुंतवणूक आकर्षक आहे हे पाहून हा गुंतवणुकीचा तोल सांभाळला जातो. हे असे स्वयं-संतुलन (निधी व्यवस्थापकांच्या तत्परतेतून) व्यक्तिगत गुंतवणूकदारांमध्ये दिसणारा भावनेचा पदर दूर करून ‘अल्प किमतीला खरेदी आणि उच्च किमतीला विक्री’ अशा व्यवहारी धोरणाची खातरजमा नेमकेपणाने करते.

बॅलन्स्ड योजनांतून गुंतवणूदारांचा भांडवलवृद्धीसाठी आवश्यक समभाग गुंतवणुकीत सहभाग असतो, पण तो योग्य जोखीम संतुलनासह. गेल्या दोन वर्षांतील भांडवली बाजारातील बहारदार तेजीने, काही कोपरे असे आहेत जेथे मूल्यांकन खूपच अधिक ताणले गेले आहे. अशा स्थितीत बाजारात अस्थिरतेची शक्यता अटळच आहे. अशा स्थितीत स्थिर उत्पन्न (डेट) बाजारातील गुंतवणुकीचा हिस्सा हाच आपल्या गुंतवणुकीला संभाव्य धक्के पचविणारा आधार देणारा ठरेल.

(लेखक, व्यवस्थापकीय संचालक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:07 am

Web Title: balanced fund fund investment
Next Stories
1 रुपयाची दमदार वर्षसुरुवात
2 दलाली व्यवसाय : बाजारानुरूप बदलते कल
3 सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट नाही
Just Now!
X