नव्याने बँक परवाना मिळालेल्या बंधन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसच्या बँक व्यवसायास येत्या २३ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्यात मुख्यालय असलेल्या बँकेच्या पहिल्याच दिवशी देशभरात ६०० शाखा कार्यरत होतील.
बंधन बँकेमुळे ग्रामीण भागात बँक खाते नसलेल्यांना सूक्ष्म वित्तसेवेबरोबरच अल्प दरात गृहकर्ज तसेच ठेवी ठेवण्यासही पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास बंधनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर घोष यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पूवरेत्तर राज्यांमध्ये प्राबल्य असलेल्या बंधनची सध्या विविध २२ राज्यांमध्ये २०२२ सेवा केंद्रे आहेत. तर ६६ लाख ग्राहक संख्या व मार्च २०१५ अखेपर्यंत ९५०० कोटी रुपयांची कर्जे वितरित झाली आहेत. २२ ते २४ टक्के वार्षिक व्याजदरावर वित्तपुरवठा करणाऱ्या बंधनला व्याजातून होणारे उत्पन्न हे १० टक्के असून अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण एक टक्का आहे. बंधनने गेल्या आर्थिक वर्षांत ४२८ कोटी रुपये नफा कमाविला आहे.
गेल्या वर्षभरात ८५०० कर्मचारी भरती करणाऱ्या बंधनने केवळ बँक व्यवसायासाठी १८५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. बँकेत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी), जीआयसी (सिंगापूर) व सीडबी (सार्वजनिक लघुउद्योग विकास बँक) यांची भागीदारी आहे. ५०० कोटी रुपयांचे भांडवल असलेल्या बंधन बँकेसाठी आतापर्यंत १०२० कोटी रुपये उभारण्यात आले असून निव्वळ मालमत्ता २७०० कोटी रुपयांपुढे आहे.
बंधन तिची दोन हजारांहून अधिक सेवा केंद्रे आहेत त्याच स्थितीत ठेवणार असून, बँकेच्या पहिल्या दिवसापासून देशभरात ६०० शाखाही असतील, असे घोष यांनी सांगितले. देशातील २.६८ लाख खेडय़ांपर्यंत पोहोचणाऱ्या बंधनच्या २०० शाखा या महानगरे व बडय़ा शहरांमध्ये, तर उर्वरित निमशहरे व ग्रामीण भागात असतील.