सलग तीन दिवसांच्या सुटय़ांमुळे देशभरातील बँकांचे व्यवहार शुक्रवारपासून बंद राहणार आहेत. राष्ट्रीयीकृत, खाजगी तसेच सहकारी बँकांच्या शाखा येत्या सोमवारीच पूर्ववत सुरू होतील.
ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी (दि.२५) तर प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहेत. तसेच जोडून रविवारही (दि.२७) येत असल्याने बँकांचे कामकाज सलग तीन दिवस थंडावणार आहे. तीन दिवसांच्या सुटय़ांमुळे अनेक बँकांनी गुरुवारी कामकाजाचे तास वाढविले होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत स्टेट बँकेचाही समावेश होता. या सुटय़ांमुळे कामकाजावर विपरित परिणाम होणार असून खातेदार-ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बँकांमार्फत यापूर्वीच करण्यात आले आहे. सुटय़ांमुळे धनादेशांच्या ‘क्लिअरिंग’चे काम बुधवापर्यंत (दि.३०) होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी २९ जानेवारीला रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण आहे.