आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील आर्थिक दुर्बल घटकाला सक्षम करण्यात सहकारी बँकांनी प्रयत्नशील राहावे. त्याचप्रमाणे ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करावे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना मूल्याधिष्ठित जीवनमूल्ये जपावीत, निर्यातवाढीला प्राधान्य देत आर्थिक प्रगतीचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

रविवारी येथे आयोजित जनता सहकारी बँक लि. पुणेचा ७१ वा वर्धापनदिनानिमित्त आत्मनिर्भर भारत योजनेत लघुउद्योजक व बँकांचे योगदान या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या समयी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, बँकेचे अध्यक्ष माधव (अभय) माटे, उपाध्यक्षा अलका पेटकर, संचालक मंडळ सदस्य, मुख्याधिकारी जयंत काकतकर उपस्थित होते.