नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच बँक कर्मचारी आणि विमा कंपन्यातील कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँकींग क्षेत्रातील प्रमुख कामगार संघटना ८ जानेवारी रोजी संपावर जाण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय व्यापार संघटनेच्या ८ जानेवारी रोजी होणाऱ्या संपामध्ये बँकींग क्षेत्रातील प्रमुख कामगार संघटनांनीही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली. बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव सी.एच.व्यंकटचलम यांनी सांगितलं की, आम्ही राष्ट्रव्यापी संपाचं समर्थन करत आहोत. कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचं संरक्षण, रोजगारनिर्मिती आणि कामगार कायद्यात बदल थांबवण्याच्या मागण्या यावेळी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
एआयबीईए, एआयबीओए, बीईएआय, आयएनबीईएफ आणि आयएनबीओसी या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे व्यंकटचलम यांनी सांगितलं. तसंच रिझर्व्ह बँकेचे कर्मचारीही या संपात सहभागी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. याव्यतिरिक्त सहकारी बँक, ग्रामीण बँक, एलआयसी आणि सामान्य विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही या संपाचं समर्थन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 21, 2019 1:43 pm