तुटपूंजी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना अमान्य

नवी दिल्ली : अवघी दोन टक्के वेतनवाढ देऊ करणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात बँक कर्मचारी -अधिकाऱ्यांतर्फे येत्या ३० मे आणि ३१ मे असा दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे.

‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (आयबीए) या बँक व्यवस्थापन संघटनेबरोबर झालेला यापूर्वीचा वेतनसुधार १५ टक्क्यांच्यावाढीसह झाला होता. मात्र ५ मे रोजी बँक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेमध्ये अवघे २ टक्के वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव बँक व्यवस्थापनाकडून पुढे करण्यात आला.

‘आयबीए’चा हा प्रस्ताव आम्हाला मान्य नसून त्याचा निषेध महिनाअखेरच्या दोन दिवसांच्या देशव्यापी संपाद्वारे करण्यात येईल, असे ‘युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन’ (यूएफबीयू) ने शुक्रवारी जाहीर केले. यूएफबीयू हे देशातील १० कोटी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एआयबीईए, एआयबीओसी, बेफी अशा विविध नऊ राष्ट्रीय संघटनांचे संयुक्त व्यासपीठ आहे.