नवी दिल्लीत कामगार आयुक्तांपुढे बँक व्यवस्थापनाशी वेतनवाढीवरून झालेली चर्चा पुन्हा फिस्कटली असून कर्मचाऱ्यांनी येत्या आठवडय़ात २५ ते २८ फेब्रुवारी अशा सलग चार दिवसांच्या संपाचा निर्धार कायम ठेवला आहे. चर्चेची पुढील फेरी आता मुंबईत अगदी संपाच्या तोंडावर सोमवारी, २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत शुक्रवारी नवी दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांसमोर चर्चा झाली. विविध नऊहून अधिक बँक कर्मचारी संघटनेचे नेतृत्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’चे व बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’चे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
व्यवस्थापन संघटना या वेळी आपल्या आधीच्या १३ टक्के वेतनवाढीच्या भूमिकेवर ठाम होती. तर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीही १९.५ टक्के मागणीवर अडून बसले. यापूर्वी या दोन्ही गटांकडून अनुक्रमे ११.५ व २३ टक्केमागणी करण्यात आली होती.
‘बँकांनी नव्या वेतनवाढीसाठीची तरतूदही केली आहे; मात्र प्रत्यक्षात केवळ १३ टक्के वाढीचेच गाजर दाखविले जात आहे,’ असा आरोप कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कर्मचारी व व्यवस्थापनादरम्यान सोमवारी पुन्हा बैठक होत असतानाच २३ फेब्रुवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू होत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 2:56 am