गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला लाखो बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा तिढा ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावर सुटला आहे. बॅंक कर्मचारी बुधवारपासून चार दिवस संपावर जाणार होते. मात्र त्यापूर्वीच बँक व्यवस्थापनाने पगारवाढीची मागणी मान्य करून त्यांना खूशखबर दिली आहे. संप टळल्याने ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे.
देशातील सार्वजनिक बँकांमधील कर्मचारी, अधिकारी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना व बँक व्यवस्थापनाची संघटना ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या प्रतिनिधींची सोमवारी मुंबईत चर्चा झाली. यापूर्वी शुक्रवारी नवी दिल्लीत मुख्य कामगार आयुक्तांपुढे झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. त्यामुळे कर्मचारी संघटना संपावर ठाम होत्या. सोमवारच्या चर्चेत बँक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीलाच २५ टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. मात्र व्यवस्थापन प्रतिनिधींनी ११.५ टक्के वेतनवाढीपासून चर्चेला सुरुवात केली. चर्चेअंती १५ टक्के वेतनवाढ मंजूर करण्यात आली. ही वेतनवाढ १ नोव्हेंबर २०१२ पासून लागू होणार आहे. यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांना ४,७२५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याबरोबरच राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी मिळणार आहे. या सुटीच्या बदल्यात अन्य शनिवारी (पहिल्या व तिसऱ्या) बँकेत पूर्णवेळ काम करण्याची अट मान्य करण्यात आली आहे. बॅंक कर्मचारी २०१२ पासून वेतनवाढीच्या प्रतीक्षेत होते. त्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सोमवारच्या चर्चेत कर्मचारी संघटना सुरुवातीच्या २५ टक्क्य़ांवरून थेट १९.५ टक्क्य़ांवर, तर व्यवस्थापन ११.५ वरून १३ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली होते. यशस्वी चर्चेनंतर दोघांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कर्मचाऱ्यांची ‘सोशल नेटवर्किंग’वर नाराजी
यापूर्वी वार्षिक १७.५ टक्के वेतनवाढ मिळविणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांनी या वेळच्या १५ टक्के वाढीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘व्हॉट्सअप’वरही संघटनेच्या प्रतिनिधींबद्दल आक्षेप नोंदविले जात होते. सोमवारी करार होताच ‘नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्सच्या उपाध्यक्ष अश्विनी राणा यांनी १५ टक्के वेतनवाढीबद्दल समाधानी नसल्याचे म्हटले आहे.

अनेकदा ऐन वेळी संप मागे..
गेल्या जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. यामध्ये संपाचाही समावेश होता. २ ते ५ डिसेंबर २०१४ मध्ये कर्मचाऱ्यांनी सलग चार दिवसांचा संप पुकारला होता. तेव्हा चर्चा यशस्वी होण्याच्या आशेवर दोन वेळा संप मागे घेण्यात आला होता. यंदाही संप ऐन वेळेवर मागे घेण्यात आला असला तरी तत्पूर्वी वाढीव वेतन कर्मचारी संघटनेने पदरात पाडून घेतले आहे.