News Flash

बँक, ऊर्जा समभागांत विक्रीचा दबाव ; निर्देशांकांत अर्ध्या टक्क्यांनी घसरण

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४७.५५ अंश घसरणीसह ४०,२३९.८८ पर्यंत आला.

सप्ताहारंभीच वरच्या टप्प्याला पोहोचलेल्या भांडवली बाजारात विक्री करून लाभ पदरात पाडून घेण्याचे सत्र गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या व्यवहारात सुरुवातीपासून अनुसरले. विशेषत: बँक, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या विक्रीने दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्याहून अधिक घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४७.५५ अंश घसरणीसह ४०,२३९.८८ पर्यंत आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८०.७० अंश घसरणीने ११,८५६.८० वर स्थिरावला. अमेरिका-चीन व्यापार तणावात घसरण नोंदविलेल्या विशेषत: आशियाई निर्देशांकांच्या हालचालींना येथेही साथ मिळाली.

किरकोळ का होईना चालू आठवडय़ाची सुरुवात निर्देशांकांनी वाढीसह केली. परिणामी, मंगळवारच्या सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ४०,५०० तर निफ्टी ११,९२५ नजीक होता. मात्र सत्राचे व्यवहार जसे पुढे सरकत गेले तसा गुंतवणूकदारांचा विक्री दबाव वाढला.

सत्रअखेर सेन्सेक्समध्ये येस बँकेचे समभाग मूल्य सर्वाधिक, १०.०५ टक्क्यांनी खाली आले. त्याचबरोबर पॉवरग्रिड, इंडसइंड बँक, एनटीपीसी, आयटीसी, टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, हीरो मोटोकॉर्प, महिंद्र अँड महिंद्र, एचसीएल टेक आदींचे मूल्य २.६६ टक्क्यांपर्यंत घसरले.

प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीतही बजाज फायनान्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आदी मात्र एक टक्क्यापर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. त्यातही बहुपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक फरकाने घसरला.

ऊर्जा, तेल व वायू, पोलाद, माहिती तंत्रज्ञान आदी निर्देशांक जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले. दिवाळी सण असलेल्या नोव्हेंबरमध्ये जवळपास सर्वच गटातील वाहन विक्री दुहेरी अंकापर्यंत घसरल्याने बीएसई ऑटो इंडेक्स ०.७९ टक्क्यांनी घसरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:31 am

Web Title: bank energy sales decline by percent akp 94
Next Stories
1 स्टेट बँकेच्या बुडीत कर्ज नोंदीत ११,९३२ कोटींची तफावत
2 बँक खातेदारांना ठेव विम्याची अवघी २९६ कोटींची भरपाई
3 म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांत वाढ
Just Now!
X