नव्या वर्षांत बँकांकडून भेट; पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

नोटाबंदीच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून चलनताप सहन करणाऱ्या देशवासीयांचा नववर्षांचा पहिला दिवस कर्ज स्वस्ताईच्या आनंदवार्तेने उजाडला. भारतीय स्टेट बँकेने कर्जाच्या व्याजदरात ०.९ टक्क्यांची कपात करत १ जानेवारीपासून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यापाठोपाठ पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँकेनेही आपापल्या व्याजदरांत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या वर्षांत गृहकर्जे स्वस्त होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, कर्ज स्वस्त होत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान, बँकांनी गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीयांकडे विशेष लक्ष पुरवून त्यांना स्वस्तात कर्जे कशी मिळतील या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत भारतीय स्टेट बँकेने रविवारपासूनच आपल्या व्याजदरात ०.९ टक्के कपात करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता स्टेट बँकेच्या कर्जावरील व्याजदर ८ टक्के एवढा असेल. ही योजना एक वर्ष मुदतीसाठी असेल.

दरम्यान, स्टेट बँकेपाठोपाठ पंजाब नॅशनल बँक व युनियन बँक यांनीही तातडीने आपापल्या व्याजदरांत कपात केली. पंजाब नॅशनल बँकेने व्याजदरात ०.७ टक्के कपात केली. त्यामुळे आता या बँकेच्या कर्जाचा व्याजदर ८.४५ टक्के असेल, तर तीन व पाच वर्षांच्या कर्जमुदतीवर अनुक्रमे ८.६० आणि ८.७५ टक्के व्याजदर लागू असेल. युनियन बँकेने ०.६५ ते ०.९ टक्के व्याजदर कपात केली आहे.

बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीचे स्वागत आहे. नोटाबंदीमुळे कर्जस्वस्ताई अवतरली आहे. नव्या वर्षांत कर्जपुरवठय़ाचे प्रमाण वाढेल, अशी आशा आहे. अर्थव्यवस्थेसाठी ही सकारात्मक सुरुवात आहे.

– शक्तिकांत दास, केंद्रीय अर्थव्यवहार सचिव

इंधन दरांत वाढ

देशांतर्गत तेलउत्पादक कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे एक रुपया २९ पैसे व ९७ पैसे वाढ केली. गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. दर महिन्याच्या पहिल्या व १५ तारखेला कंपन्यांकडून इंधनाच्या किमतीचा आढावा घेतला जातो.