दोन बँकांकडून व्याजदरात वाढीचा निर्णय

रिझव्‍‌र्ह बँकेने गृह कर्ज, वाहन कर्जदारांवर वाढीव बोजा लादणारी ‘रेपो दरा’तील पाव टक्क्य़ाच्या वाढीचे पतधोरण बुधवारी जाहीर केले आणि त्याचा परिणाम म्हणून बँकांनी लगोलग त्यांचे कर्जावरील व्याजाचे दर वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. गुरुवारी दोन बँकांनी थेट दरवाढ जाहीर केली आहे, तर पाठोपाठ आणखी काही बँकांकडून असा निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर केला जाणे अपेक्षित आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने साडेचार वर्षांच्या खंडांनतर, म्हणजेच केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच रेपो दर ६ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर नेले. खनिज तेलाच्या भडकलेल्या किमती आणि महागाई दरातील वाढीच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला.  व्याज दरवाढीच्या या घावामुळे काही काळापासून स्थिर असलेले कर्जाचे व्याजदर आता झेपावू लागले आहेत. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेने गेल्याच आठवडय़ात आपले किमान ऋण दर (एमसीएलआर) उंचावत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर गुरुवारी या बडय़ा बँकांच्या पावलावर पाऊल ठेवत, इंडियन बँक आणि करूर वैश्य बँकेने वेगवेगळ्या मुदतीसाठी ऋण दर ०.१० टक्क्याने वाढवीत असल्याचा निर्णय जाहीर केला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुधवारच्या निर्णयामुळे अन्य व्यापारी बँकांही कर्जदारांसाठीचा व्याजदर ०.१० ते ०.१५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता असून यामुळे गृह, वाहन आदी कर्जदारांवरील मासिक हप्त्याचा भार वाढणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने व्याजदर वाढीचा निर्णय घेतला नसला तरी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी रेपो दरातील वाढीचे संक्रमण हे बँकेच्या ऋण दरातील वाढीतून लवकरच दिसून येईल, असे संकेत दिले आहेत.