News Flash

बँक कर्ज घोटाळ्यात ‘मारुती’चे माजी प्रमुख खट्टर यांच्यावर गुन्हा

खट्टर हे मारुती उद्योग लिमिटेड कंपनीत १९९३ ते २००७ पर्यंत व्यवस्थापैकीय संचालक पदावरून निवृत्त होईपर्यंत कार्यरत होते.

मारुती उद्योग लिमिटेडचे माजी व्यवस्थापैकीय संचालक जगदीश खट्टर यांच्या विरोधात त्यांच्या नवीन कंपनीने केलेल्या ११० कोटींच्या कर्ज घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण खात्याने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे.

या संबंधाने दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालात, खट्टर आणि त्यांची नवीन कंपनी कारनेशन ऑटो इंडिया लिमिटेडने पंजाब नॅशनल बँकेला ११० कोटींना गंडा घातला असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने ७७ वर्षीय खट्टर यांचे निवासस्थान व कारनेशन ऑटोच्या कार्यालयांवर सोमवारी सायंकाळी छापे टाकले.

खट्टर हे मारुती उद्योग लिमिटेड कंपनीत १९९३ ते २००७ पर्यंत व्यवस्थापैकीय संचालक पदावरून निवृत्त होईपर्यंत कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी कारनेशन ऑटो कंपनी स्थापन केली. त्यासाठी त्यांनी २००९ मध्ये १७० कोटींचे कर्ज घेतले होते. २०१५ मध्ये हे कर्ज २०१२ पासून अनुत्पादक झाल्याचे प्राथमिक माहिती अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीनंतर भादंविनुसार प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे.

खट्टर यांनी वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, कारनेशन ऑटो हा अपयशी उद्योग ठरला, मात्र त्यात आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कंपनीच्या लेख्यांचे परीक्षणही करण्यात आले असून त्यात गैरप्रकार दिसून आले नाहीत. आता बँकेने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले. त्यानंतर सीबीआयने छापे टाकले त्यात आक्षेपार्ह काही सापडले नाही. चौकशी पूर्ण होऊन शेवटी आमची बाजू सत्याची असल्याचे स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खट्टर आणि त्यांच्या कंपनीने अप्रामाणिकपणा करून बँकेला फसवले व निधी इतरत्र वळवून विश्वासघात केला, असा सीबीआयचा स्पष्ट आरोप आहे. यातून बँकेला तोटा झाला, तर खट्टर व त्यांच्या कंपनीला फायदा झाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. बँकेने केलेल्या न्यायवैद्यक लेखापरीक्षणात ६६.९२ कोटींच्या वस्तू बँकेची कोणतीही परवानगी न घेता ४.५५ कोटी रुपयांना विकण्यात आल्याचे दिसून आले. हा कमावलेला पैसा बँकेत जमा केला गेला नाही. खट्टर यांनी अप्रामाणिकपणा करून उपकंपन्यांना कर्ज आणि अग्रिम दिले. त्यातून बँक कर्जाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला. बँक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वस्तू साठय़ाची पडताळणी, तसेच धनको व ऋणको यांची उलटतपासणी केली नाही. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद आहे.

पंजाब नॅशनल बँके ने या प्रकरणात पाच जणांची आरोपी म्हणून नावे नमूद केली असून त्यात खट्टर ऑटो इंडिया प्रा. लि., कारनेशन रिअ‍ॅल्टी प्रा.लि., कारनेशन इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी प्रा. लि. यांचा समावेश आहे. ते तीनही कर्जाचे हमीदार आहेत, पण पडताळणीतून त्यांचा या प्रकरणात थेट संबंध आढळून आला नाही. सीबीआयच्या तपासात मात्र त्यांच्या भूमिका निश्चित केल्या जाऊ शकतील.

कारनेशन ऑटो हा अपयशी उद्योग ठरला, मात्र त्यात आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. – जगदीश खट्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 1:08 am

Web Title: bank loan scam crime against khattar akp 94
Next Stories
1 बँकांच्या थकीत कर्जात दिलासादायी सुधार
2 निर्देशांक घसरणीचे सलग दुसरे सत्र
3 आर्थिक मंदीत संधी निश्चितच; मात्र शिस्त आणि संयमही आवश्यक!
Just Now!
X