News Flash

बँक ऑफ बडोदा-बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण?

सार्वजनिक क्षेत्रातील सशक्त व अशक्त बँकांच्या विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळणार आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबईत मुख्यालय असलेल्या बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दोन आघाडीच्या बँकांचे विलीनीकरण नव्या आर्थिक वर्षांत होणार आहे. वाढत्या कर्जाचा भार असलेल्या या बँकांचा मार्च २०१७ पर्यंत ताळेबंद स्वच्छ झाल्यानंतर एकूणच सार्वजनिक क्षेत्रातील सशक्त व अशक्त बँकांच्या विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळणार आहे.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांत देशातील सार्वजनिक बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता प्रमाण शून्यावर आणण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. २५ हून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची अनुत्पादित मालमत्ता सुमारे ९ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. जूनअखेर बँकांच्या अनुत्पादिक मालमत्तेचे प्रमाण एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत तब्बल ११.३ टक्के नोंदले गेले आहे. देशातील एकूण २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी १२ हून अधिक बँकांचे अनुत्पादित मालमत्ता प्रमाण हे १० टक्क्यांवर पोहोचले आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘बँक बोर्ड ब्युरो’चे अध्यक्ष विनोद राय यांनी याबाबतचे संकेत ‘रॉयटर’ वृत्तसंस्थेला दिले आहेत. नव्या आर्थिक वर्षांतील पहिला टप्पा हा बँकांच्या विलीनीकरणाचा असेल, असे स्पष्ट करत मुंबईस्थित दोन बँकांचा यामध्ये क्रम असेल, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. मात्र बँकांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

राय यांनी दिलेल्या संकेतानुसार, कर्जाचा वाढता भार सहन करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा ताळेबंद मार्च २०१७ पर्यंत स्वच्छ झाल्यानंतर बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत. याअंतर्गत आर्थिकदृष्टय़ा अशक्त अशा अन्य सशक्त राष्ट्रीयीकृत बँकेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. यानुसार नव्या आर्थिक वर्षांत मुंबईत मुख्यालय असलेल्या बँक ऑफ बडोदा व बँक ऑफ इंडिया यांचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या सात ते आठवर आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांना मुख्य स्टेट बँकेत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होणार आहे.वाढत्या कर्जाचा सामना करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवली पर्याप्ततेसाठी ७०,००० कोटी रुपयांचे भांडवल ओतण्याचे सरकारने निश्चित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 2:20 am

Web Title: bank of baroda bank of india
Next Stories
1 संयुक्त गृहकर्ज घेणे कर वजावटदृष्टय़ा फायदेशीर!
2 भारतात प्रवासी वाहन बाजारपेठ वार्षिक ३० लाख विक्रीसमीप!
3 सोने लकाकणारच!
Just Now!
X