सध्या देशातील बँकींग क्षेत्र मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांत बँकांमधील एनपीएचं प्रमाण वाढलं आहे. बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या सहा वर्षांत एनपीएचं प्रमाण तब्बल सहा पटींनी वाढल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. सध्या बँक ऑफ बडोदाचा एनपीए ७३ हजार १४० कोटी रूपये झाला आहे. तर इंडियन बँकेच्या एनपीएमध्येही चार पटींची वाढ होऊन तो ३२ हजार ५६१.२६ कोटी रूपयांवर पोहोचला आहे. माहिती अधिकाराअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्त्यानं स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेकडूनही माहिती मागवली होती. परंतु या बँकांकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही.

बँक ऑफ बडोदानं दिलेल्या माहितीनुसार, २०१४ पर्यंत त्यांचा एनपीए ११ हजार ८७६ कोटी रूपये होता. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये तो वाढून ७३ हजार १४० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान एनपीए खात्यांची संख्या २ लाख ८ हजार ३६ वरून वाढून ६ लाख १७ ३०६ वर पोहोचली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते सुजीत स्वामी यांना दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे. दरम्यान, बँक ऑफ बडोदानं एप्रिल २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीदरम्यान एसएमएस अलर्टच्या माध्यमातून १०७.७ कोटी रुपये मिळवले. तर इंडियनं बँकेनं या कालावधीदरम्यान या सेवेतून २१ कोटी रूपये मिळाले असल्याची माहितीही समोर आली आहे.

इंडियन बँकेचा एनपीएही वाढला

३१ मार्च २०१४ रोजी इंडियन बँकेचा एनपीए ८ हजार ६८.०५ कोटी रूपये इतका होता. परंतु ३१ मार्च २०२० मध्ये तो वाढून ३२ हजार ५६१.२६ कोटी रूपयांवर पोहोचला. यादरम्यान एनपीए खात्यांची संख्या २ लाख ४८ हजार ९२१ वरून वाढून ५ लाख ६४ हजार ८१६ वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त बँकेनं एसएमएस अलर्ट शुल्क, लॉकर शुल्क, डेबिट-क्रेडिट कार्ड सेवा शुल्क आणि अन्य माध्यमातून मोठी रक्कम मिळवली असल्याचंही माहिती अधिकारातून समोर आलं आहे.