मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा या तीन  बँकांच्या एकत्रीकरणाच्या सरकारच्या सोमवारच्या निर्णयाचे भांडवली बाजारात मंगळवारी पडसाद उमटले. तीनमधील सर्वात मोठय़ा बँक ऑफ बडोदाचा समभाग १६ टक्क्यांनी तर तुलनेने सुस्थितीत असलेल्या विजया बँकेचा समभाग ६ टक्क्यांनी गडगडला. यातून या निर्णयावर गुंतवणूकदार वर्गही नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. या विलीनीकरणातील अशक्त देना बँकेचा समभाग मात्र तब्बल १९ टक्क्यांनी वधारलेला दिसून आला. सेन्सेक्सच्या मंगळवारच्या ३०० अंश घसरणीतही  स्टेट बँकेच्या समभागचे ४ टक्के नुकसानीसह प्रमुख योगदान राहिले.  एकूण पडझडीत खासगी क्षेत्रातील बँकांचे समभागही खाली आले. हे संभाव्य विलिनीकरण मार्गी लागल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या सध्याच्या २१ वरून, कमी होऊन १९ वर घसरेल.