आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आहेत. ब्रेग्झिटनंतरचा ब्रिटन बाहेरच्या देशातील व्यक्तिला बँकिंग क्षेत्रातील हे सर्वोच्च स्थान देईल का हा प्रश्न आहे. ब्रिटनचं पतधोरण ठरवणं आणि या देशाचं आर्थिक स्थैर्य राखणं ही काम अराजकीय व्यक्तिवर सोपवली जातात आणि त्यादृष्टीनं ज्या नावांचा विचार सुरू आहे त्यात राजन यांचं नाव आघाडीवर आहे.

ब्रिटनची बँक ऑफ इंग्लंड ही शिखर बँक 325 वर्ष जुनी असून सध्या मार्क कार्नी गव्हर्नरपदी आहेत. राजन यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली होती. ब्रेग्झिटनंतर ब्रिटनची अवस्था कशी असेल यावर सूचक भाष्य करताना राजन यांनी इंग्लंड जगातल्या अन्य देशांशी कसे संबंध ठेवतो हे यादृष्टीनं महत्त्वाचं असेल असे म्हटले होते.

राजन यांच्याखेरीज अँड्र्यू बेली यांचं नाव अग्रस्थानी चर्चेत असून बेली हे बँक ऑफ इंग्लंडमध्येच महत्त्वाच्या पदावर आहेत. या चर्चेबाबत राजन यांनी काहीही बोलण्यास नकार दिल्याचे ब्लूमबर्गनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी तीन वर्ष राहिलेले राजन योग्य उमेदवार असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये राजन सध्या प्राध्यापक आहेत. महागाईवर लक्ष केंद्रीत करणं आणि बँकांमधील बुडीत कर्जांच्या समस्येवर मार्ग काढणं आदी उपायांसाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना राजन यांनी विशेष काम केले होते.