सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र (महाबँक)ने आगामी सप्टेंबर महिन्यात सुमारे ५०० कोटींच्या थकीत कर्ज मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
सप्टेंबरमधील प्रस्तावित ५०० कोटींच्या मालमत्तेचा लिलाव यशस्वी ठरल्यास, बँकेकडून आणखी १०००-१५०० कोटी रुपयांच्या बुडीत कर्ज मालमत्ता, या ‘मालमत्ता पुनर्रचना कंपन्यां (एआरसी)’ना विकल्या जातील, अशी महाबँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत यांनी माहिती दिली. सप्टेंबरमध्येच बँकेकडून बुडीत कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेल्या १३६ स्थावर मालमत्तांचाही लिलाव केला जाणार आहे.
महाबँकेला वाढत्या अनुत्पादित कर्ज मालमत्तांसाठी (एनपीए) कराव्या लागणाऱ्या वाढीव तरतुदीमुळे जून २०१५ अखेर संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात मोठी घसरण पाहावी लागली आहे. नुकत्याच सरलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वर्षांगणिक ४९.४ टक्क्यांनी घसरला आहे. कर्जवसुली शक्य नसलेल्या मालमत्तांचा लिलाव करून बँकेला पतगुणवत्तेच्या आघाडीवर कामगिरी सुधारता येईल, असे मुनोत यांनी स्पष्ट  केले.