व्यवसाय बांधिलकी दिन साजरा करण्याचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांचे आवाहन

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रचा ८५ वा व्यवसाय प्रारंभ दिन नुकताच साजरा झाला. यानिमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखा, विभागीय कार्यालये तसेच प्रधान कार्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य कार्यक्रम बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रधान कार्यालयात लोकमंगल लॉन्स येथे झाला. व्यवस्थापैकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि हेमन्त टम्टा आणि सर्व महाव्यवस्थापक तसेच पुणे शहर, पुणे पूर्व व पुणे पश्चिम विभागांचे व्यवस्थापक आणि मोठय़ा संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

बँकेच्या व्यवसाय प्रारंभ दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्रने नव्या गृह कर्जदारांसाठी एक विशेष भेट जाहीर केली. सिबिल स्कोअर उत्तम असणाऱ्या पगारदार ग्राहकांसाठी व्याजाचा दर ०.१५ टक्क्य़ाने कमी करण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र रेपो दराशी संलग्न व्याजदराने गृह कर्ज देते.

या प्रसंगी व्यवस्थापैकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव म्हणाले, ८५ वर्षांंपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रच्या संस्थापकांनी लावलेले बीजाचे रुपांतर आजच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाले आहे. बँक ग्राहकांना सर्व आधुनिक बँकिंग सेवा निष्ठा आणि बांधिलकी जपत देत आहे. २.७० कोटी ग्राहकांनी ठेवलेला विश्वास हेच बँकेचे खरे सामर्थ्य आहे.

बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले की, आजचा व्यवसाय प्रारंभ दिन हा व्यवसाय बांधिलकी दिन म्हणून साजरा केला पाहिजे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करून बँक प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार ग्राहक सेवा सुधारली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. कार्यकारी संचालक हेमन्त टम्टा यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये कठोर परिश्रम आणि तत्पर व सस्मित ग्राहक सेवा अतिशय आवश्यक आहेत. व्यवसायाची वाढ बरेच प्रमाणात ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून आहे. बँक अनेक ग्राहकस्नेही आणि स्पर्धाक्षम योजनांच्या द्वारे ग्राहकांना सेवा देत आहे.