मुंबई : समाजमाध्यमांतून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिस सायबर सेलमध्ये बँक ऑफ बँकेने तक्रार दाखल केली आहे.

विविध समाज माध्यमांवर बँक ऑफ महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध आणि नुकसान करणाऱ्यांविरुद्ध केली असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. बँकेबाबत वृत्त पसरविणाऱ्या सर्व बातम्यांचे संकेतस्थळ आणि संबंधित ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप खात्यांची माहिती तक्रारीच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

या चुकीच्या महितीच्या मूळ स्रोताचा शोध घ्यावा आणि या कृत्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी विनंती बँकेमार्फत तपास यंत्रणांना करण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाबतीत अदृश्य वाईट हेतूनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण होऊ शकते. समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेले वृत्त कदापीही खरे नाही तसेच वास्तविकता न जाणून घेता यामध्ये निष्कर्ष काढले गेले आहेत.

पूर्वीचा म्हणजे आधी झालेला तोटा आणि लेखा आपल्या राखीव ठेवींमधून समायोजित करण्यासाठी बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेकडे संपर्क साधला आहे. अर्थात असे जरी बँकेने अद्याप केले नसले तरी बँकेची आर्थिक स्थिती स्थिर, अखंडित आणि मजबूतच असेल.

फसवणुकीच्या संबंधित वृत्तात बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहभागीत्वाचे उल्लेख केलेले आकडे भ्रामक आणि चुकीचे आहेत. स्थावर मालमत्ता कंपन्यांना दिलेल्या कर्जामध्ये बँकेचे कर्ज कमी प्रमाणात असून यामुळे बँकेच्या ताळेबंदावर आणि नफ्यावर कमी परिणाम होईल, असेही बँकेने नमूद केले आहे.