मुंबई : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने कमी केलेल्या रेपो दराला प्रतिसाद देताना सहाहून अधिक सार्वजनिक क्षेत्रातील  बँकांनी महिन्याभरात तब्बल पाव टक्क्यापर्यंत कर्ज स्वस्त केले आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या १ ऑक्टोबरपासून कर्ज व्याजदर रेपो दराशी संलंग्न करण्याच्या सक्तीनंतर बँकांचे विविध कर्ज व्याजदर ८ टक्क्यांच्या आसपास येऊन ठेपले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रचे सर्व कालावधीचे व्याजदर ०.१० टक्क्याने कमी होत वार्षिक ८.४० टक्क्यांवर स्थिरावले आहेत. बँकेच्या कर्जदारांसाठी त्याची मात्रा ८ ऑक्टोबरपासूनच लागू झाली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेचा कर्ज व्याजदर येत्या १ नोव्हेंबरपासून वार्षिक ८ टक्के होणार आहे. तर बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदर ०.१५ टक्क्याने कमी केले आहेत. बँकेच्या निर्णयाची अंमलबजावणी १० ऑक्टोबरपासूनच होत आहे.

ऐन सणोत्सवात सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सनेही त्यांचे विविध कालावधीचे कर्ज व्याजदर कमी केले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्याजदर १० ऑक्टोबरपासून पाव टक्क्यांनी कमी झाले आहेत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे व्याजदर ८ टक्क्यांपर्यंत आले आहेत.