सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०१५-१६च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत ५९.४४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गत वर्षी याच तिमाहीत बँकेने ११७.८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. यंदा नफ्यात झालेली ४९.५५ टक्क्य़ांची घट ही प्रामुख्याने अनुत्पादित मालमत्तांसाठी केलेली वाढीव तरतूद कारणीभूत ठरली आहे.
महाबँकेचा सरलेल्या तिमाहीत ढोबळ नफा मात्र ४७१.३६ कोटींवरून ६०९.७७ कोटी रु. असा (वर्षांगणिक) २९.३६ टक्क्यांनी वाढला आहे. अर्थस्थितीत नरमाई असतानाही बँकेच्या चालू व बचत खात्यांतील (कासा) ठेवी वर्षांगणिक १०.७१ टक्क्यांनी वाढून ४,२३७ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. नक्त  व्याजापोटी उत्पन्नही ११.८८ टक्क्यांनी वाढून १,०२३.२० कोटी रुपयांवर गेले आहे.
बँकेने कृषी क्षेत्र आणि लघू व मध्यम उद्योग क्षेत्राला कर्जवाटपात चमकदार कामगिरी करताना, त्यात वर्षांगणिक अनुक्रमे १८.७५ टक्के आणि १०.१३ टक्के अशी वाढ साध्य केली आहे.
*  नव्या विमा योजनांचे १६.७५ कोटी लाभार्थी
केंद्र सरकारने सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये महाबँकेचे भरीव योगदान राहिले आहे. पंतप्रधान जनधन योजनेत बँकेने २४.८९ लाख खाती उघडली आहेत. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेसाठी ५.७५ लाख खातेदारांची तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी १०.९८ लाख खातेदारांना बँकेने सामावून घेतले आहे. शिवाय महाबँकेने सुरक्षा ठेव योजना सुरू केली असून, बँकेच्या सर्व शाखांमधून त्यासाठी नोंदणी सुरू असून, जास्तीत जास्त लाभार्थीना सामावून घेतले जात आहे.

प्रतिकूल आर्थिक वातावरणापायी बँकेच्या नक्त अनुत्पादित मालमत्तेचे (एनपीए) प्रमाण जून २०१५ तिमाहीअखेर ५.०४ टक्क्यांवर तर ठोकळ एनपीएचे प्रमाण ७.८६ टक्क्यांवर गेले आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात घसरणीसाठीही या वाढलेल्या एनपीएसाठी करावी लागलेल्या वाढीव तरतूद कारणीभूत ठरली आहे.