पुणे : पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार पट वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीअखेर बँकेने ११४.६६ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला.

अनुत्पादित कर्जाचे कमी झालेले प्रमाण आणि त्यामुळेच अशा कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीचे प्रमाण घटल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेला मागील आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीअखेर २७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी ए. एस. राजीव यांनी मंगळवारी येथे दिली. बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि हेमंत टम्टा या वेळी उपस्थित होते.

बँकेच्या व्यवसायात वाढ होऊन ३० सप्टेंबरअखेरीस बँकेचा व्यवसाय २.३३ लाख कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीअखेरीस बँकेचा व्यवसाय २.२६ लाख कोटी रुपये होता. बँकेच्या ठेवींमध्येही वाढ झाली असून हे प्रमाण १,४१,४४०.३६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेला कोणताही धोका नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे राऊत यांनी आवाहन केले.

बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाच्या प्रमाणातही घट झाली आहे. बँकेला यंदा ढोबळ अनुत्पादित कर्जाचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण १६.८६ टक्के राखण्यात यश आले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण १८.६४ टक्के होते.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांनुसार सप्टेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीत २,२२४.४९ कोटी रुपयांची कर्जाऊ  रक्कम ही ‘फ्रॉड’ ठरविण्यात आली असून त्यासाठी १०० टक्के तरतूद केली गेली आहे. कर्जवसुलीचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असलेल्या १७ कर्जप्रकरणांसाठी बँकेने ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीअखेर १०० टक्के म्हणजे १,६०६.१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर सप्टेंबर २०१९ अखेर ७५१.७८ कोटी इतका परिचालित नफा बँकेला झाला आहे.