बॅक ऑफिस या मालिकेतील हा चौथा आणि शेवटचा लेख. हा एकूणच विषय खूप सोप्या प्रकारे समजावून सांगितल्याबाबतचे फोन आणि ईमेल अनेक वाचक तसेच बँक कर्मचाऱ्यांनी पाठविले त्यांचे आभार. दोन तीन वाचकांनी मात्र ‘‘हे सर्व डीपी स्टाफचे काम आहे आणि ते ती मंडळी करतातच मग या लेखांचे प्रयोजन काय’’ असा सूर लावला. यामागे अशी विचारसरणी होती की, अनेक कार्यालयात तिथले कर्मचारी आपल्या टेबलापुरते काम यांत्रिकपणे करीत असतात पण पडद्यामागे काय घडामोडी होत असतात हे मात्र अनेकदा माहीत नसते. काही वेळा मात्र या अज्ञानाची झळ ग्राहकाला लागण्याची शक्यता असते. काही वर्षांपूर्वी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो. एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या मुलुंड शाखेत एक ग्राहक डिमॅट खाते उघडायचा अर्ज भरून घेऊन गेला सोबत योग्य ती केवायसी कागदपत्रे होतीच. सदर बँकेच्या मुलुंड शाखेला तेव्हा अर्जाची डेटा एंट्री करायची परवानगी होती. तात्पर्य दुसऱ्या दिवशी डिमॅट खाते क्रमांक ग्राहकाला कळू शकला असता. मात्र ही डेटा एंट्री करणाऱ्या कर्मचाऱ्याला बॅक ऑफिस म्हणजे काय याचा सुतराम गंध नव्हता की त्याने ते आपल्या सहकाऱ्यांकडून जाणून घ्यायची तसदी घेतली नव्हती. उपरोक्त ग्राहकाने अर्ज सादर करून सहजगत्या कर्मचाऱ्याला विचारले की, ‘‘मला डिमॅट खाते क्रमांक कळायला किती दिवस लागतील?’’ यावर त्या कर्मचाऱ्याने उत्तर दिले की, ‘‘सीडीएसएलमध्ये इथून कनेक्टिव्हिटी मिळायला १५ दिवस लागतात, त्यानंतरच हे होईल.’’ प्रत्यक्षात बॅक ऑफिस यंत्रणा बँकिंग नेटवर्कद्वारे कायम जोडलेली असते त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने केलेली डेटा एंट्री तात्काळ अर्थात काही तासात बँकेच्या बॅक ऑफिस सव्‍‌र्हरद्वारे केली तर ती सीडीएसएलकडे जाऊन खाते क्रमांक तयार होणार होता. पण या सर्व तांत्रिक बाबीचे ज्ञान नसल्याने असे चुकीचे उत्तर ग्राहकाला दिले गेले. परिणाम असा झाला की ग्राहक नाराज होऊन त्याने आपला खाते उघडण्याचा फॉर्म परत मागितला! आता त्या ग्राहकाने ‘‘या बँकेत डिमॅट खाते उघडायला पंधरा दिवस लागतात” असा चुकीचा प्रचार आपल्या वर्तुळात केला तर काय होईल ?  
गेल्या सर्व लेखात बँक ऑफ इंडियाचे केवळ प्रातिनिधिक उदाहरण दिले, इतर कोणतीही बँक किंवा ब्रोकर डीपी असो सगळय़ांची बँक ऑफिस प्रणाली एकाच प्रकारे काम करीत असते. शेरखानसारखा ब्रोकर त्याचे मालवण येथे असलेल्या कार्यालयाच्या संगणकाचा आणि ब्रोकिंगच्या नेटवर्कचा वापर करून मालवण येथून डिमॅट सेवा देऊ शकतो. तात्पर्य देशातील कानाकोपऱ्यातून ही सेवा उपलब्ध आहे.
डिमॅट खात्याविषयी काही प्रश्नांचे निरसन
प्रश्न: माझ्या एका नातेवाईक व्यक्तीने माझ्या नावे मृत्युपत्र केले आहे. पण त्या आधारे त्याच्या डिमॅट खात्यातील शेअर्स माझ्या डिमॅट खात्यात जमा करायला डीपी नकार देत आहे. असे का?
उत्तर- केवळ मृत्युपत्र सादर करणे पुरेसे नाही. मृत्युपत्राची अस्सलता सिद्ध करून तशी ऑर्डर न्यायालयातून मिळवावी लागते. त्याला ‘प्रोबेट’ असे म्हणतात. प्रोबेटची कॉपी डीपीकडे सादर करून योग्य त्या नमुन्यात अर्ज केल्यास मृत व्यक्तीच्या खात्यातील शेअर्स आपल्या खात्यात डीपी जमा करील.
प्रश्न: एखाद्या डिमॅट खातेदाराने नॉमिनेशन केले आहे. शिवाय मृत्युपत्रही केले आहे. अशा प्रसंगी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील शेअर्स कुणाला मिळतील.. नॉमिनीला की वारसाला?
उत्तर- अर्थातच नॉमिनीला.
प्रश्न: नॉमिनी हा शेअर्सचा मालक असतो का?
उत्तर- नाही. कोर्टामार्फत देण्यात आलेल्या विविध निकालामधून असे सूचित करण्यात आलेले आहे की, नॉमिनी हा जणू एक विश्वस्त असतो. योग्य त्या लाभार्थीला (बेनिफिशिअरी) संबंधित खात्यातील शेअर्स ट्रान्सफर होईपर्यंतची ती व्यवस्था आहे अशी संकल्पना त्यामागे आहे.
प्रश्न: नॉमिनी हा कुटुंबातील व्यक्तीच पाहिजे असे आहे का?
उत्तर- नाही. नॉमिनी म्हणून कुटुंबाबाहेरील व्यक्तीची पण नेमणूक करता येते.
प्रश्न: तीन व्यक्तींच्या नावे डिमॅट खाते आहे ज्यात माझे नाव नॉमिनी म्हणून आहे. तीन पकी दोन व्यक्तींचे निधन झाले आहे. अशा प्रसंगी त्या खात्यातील शेअर्स माझ्या खात्यात जमा होऊ शकतात का?
उत्तर- नाही. अशा परिस्थितीत तिसरा खातेदार- जो हयात आहे त्याच्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर होतील. सर्व खातेदारांचे निधन झाले तरच नॉमिनीच्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर होऊ शकतात.
प्रश्न: जॉइंट खात्यात नॉमिनेशन करता येते का?
उत्तर-  होय. मात्र सर्व खातेदारांनी नॉमिनेशन फॉर्मवर स’ाा करणे आवश्यक आहे.
प्रश्न: ज्या व्यक्तीचे नाव आपण डिमॅट खात्यात नॉमिनी म्हणून लिहितो त्याचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे का?
उत्तर-  नॉमिनी नेमतेवेळी पॅन कार्ड असणे सक्तीचे नाही. पण खातेदारांच्या मृत्यूनंतर जेव्हा नॉमिनी शेअर्स त्याच्या खात्यात हस्तांतरण करण्याची मागणी करील तेव्हा त्याचे डिमॅट खाते असलेच पाहिजे व ते उघडायला तेव्हा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.