खासगी बँक अधिकाऱ्याच्या निलंबनार्थ आंदोलन

नव्या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याच्या दिवशीच सार्वजनिक बँकांमधील देशभरातील अधिकारीवर्ग एक दिवसाचा संप पुकारणार आहेत. विशेष म्हणजे सरकारी बँकांमधील अधिकारी हे खासगी क्षेत्रातील एका अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा या दिवशी निषेध करणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दरम्यान, २९ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

याच दिवशी सार्वजनिक बँकांमधील अधिकारी वर्गाने संप पुकारण्याची घोषणा ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन’ (एआयबीओसी) चे सरचिटणीस हविंदर सिंग यांनी केली आहे.

याच संघटेच्या केरळ राज्याचे अध्यक्ष असलेले व धनलक्ष्मी बँक ऑफिसर्स ऑर्गेनायजेशनचे सरचिटणीस असलेले पी. व्ही. मोहनन यांना सेवेतून निलंबन करण्यात आल्याचा निषेध या आंदोलनाद्वारे व्यक्त करण्यात येणार आहे. धनलक्ष्मी ही केरळस्थित मुख्यालय असलेली खासगी बँक आहे.

एक दिवसाच्या या संपात २.७५ लाखांहून अधिक अधिकारीवर्ग सहभागी होईल, असा दावा संपकरी संघटनेने व्यक्त केला आहे. अनेक सार्वजनिक बँकांनी याबाबतची पूर्वसूचना आपल्या ग्राहकांना विविध शाखांमधून दिली आहे.