वेतनवाढीसाठी बुधवारी पुकारण्यात येणारा देशव्यापी बँक संप मागे तूर्त मागे घेण्यात आला आहे. बँक संघटनेचे नेते व बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधी यांच्यादरम्यान मुंबईत मंगळवारी झालेल्या चर्चेत पुन्हा वाटाघाटी करण्याचे ठरले.
२३ टक्के वेतनवाढीच्या मागणीसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली विविध नऊ बँक कर्मचारी, अधिकारी संघटनांद्वारे बुधवारी देशभरात एक दिवसाचा संप पुकारण्यात येणार होता. याबाबत मंगळवारी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ या बँक व्यवस्थापन संघटनेबरोबर कर्मचारी, अधिकारी संघटनेच्या नेत्यांची चर्चा झाली. त्यात व्यवस्थापनाने आपल्या आधीच्या ११ टक्क्य़ांवरून १२.५० वाढीव वेतन देण्याची तयारी दर्शविली. कर्मचारी संघटनेने यापूर्वीच २५ टक्क्य़ांवरून आपली मागणी २३ व नंतर १९.५ टक्क्य़ांवर आणली आहे. मात्र १२.५० टक्क्य़ांवर संघटना सहमत नसून याबाबत बुधवारी पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याने तूर्त बँक संप पुढे ढकलण्यात आल्याची माहिती ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे उपाध्यक्ष  (एआयबीईए) विश्वास उटगी यांनी दिली. चर्चेसाठी व्यवस्थापनाने नव्याने तयारी दर्शविली असून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बुधवारचा संप मागे आम्ही घेत आहोत; मात्र चर्चेबरोबरच बुधवारचे निदर्शने आंदोलन कायम राहणार असून आगामी संपाबाबत लगेचच भूमिका जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनेने २१ ते २४ जानेवारीदरम्यानच्या आंदोलनाचाही इशारा दिला आहे. वेतन तिढा न सुटल्यास बेमुदत संपाची हाक आहे.  मागण्यांसाठी संघटनेने यापूर्वी डिसेंबरमध्ये विभागीय संपही पुकारला होता.