मुंबई : बँक व्यवस्थापनाने देऊ केलेल्या अवघ्या २ टक्के वेतनवाढीच्या निषेधार्थ सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला बुधवारी सुरुवात झाली.

तब्बल १० लाख कर्मचारी, अधिकारी या आंदोलनात उतरल्याने पहिल्या दिवशी शाखांमधील व्यवहार बंद झाले. तर गुरुवारीही संप कायम राहणार असल्याने एटीएम ठप्प पडण्याची चिन्हे आहेत.

ऐन महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये बँकविषयक कामकाज विस्कळीत होणार असल्याने मेमहिन्याच्या लाखोंच्या वेतनावरही विपरित परिणाम होणार आहे.

विविध नऊ कर्मचारी, अधिकारी संघटनांच्या नेतृत्वाखाली ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या विरोधात दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.

बुधवारी, पहिल्या दिवशी सरकारी बँका या आंदोलनात सहभागी झाल्या. एचडीएफसी, आयसीआयसीआयसारख्या खासगी बँकांचे मात्र व्यवहार नियमित होते.

भारतीय बँकिंगमध्ये ७० टक्के हिस्सा राखणाऱ्या सरकारी बँकांच्या आंदोलनामुळे मुदत ठेवी, त्यांचे नुतनीकरण, सरकारी रोखे व्यवहार तसेच धनादेश वटणावळीलाही विलंब लागणार आहे. डिजिटल बँकिंगचा एकूण व्यवहारात अवघा ५ टक्के हिस्सा असल्याने संपपरिणाम अधिक भीषण होत आहे. बँक कर्मचाऱ्यांना यापूर्वी, २०१२ मध्ये १५ टक्के वेतनवाढ दिली होती. तुलनेत २०१७ पासून २ टक्के वेतनवाढ लागू करण्यात येत आहे.

महाराष्ट्र            मुंबई</p>

संपकरी कर्मचारी      ६०,०००             २५,०००

बँक शाखा               १२,०००                  ४,०००

व्यवसाय              रु.४०लाख कोटी       रु.३०लाख कोटी

 

२१ सरकारी बँका ८५,००० बँक शाखा

रु. ५०,००० कोटी मार्चअखेर बँकांचा तोटा

रु. २०,००० कोटी संपामुळे नुकसानाचा

असोचेमचा अंदाज

वेतनवाढीसाठी बँक कर्मचारी संघटनानी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे ग्राहकांना सामान्य बँकिंग सेवा प्राप्त करण्यात समस्या होत आहे. म्हणूनच, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांसाठी डिजिटल बँकिंग सेवा म्हणजे यूपीआय, महामोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स, इंटरनेट बँकिंग सुविधा वापरण्याची विनंती करतो.

– रवींद्र पी. मराठे, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र.

बँकेचा कर्मचारीनिहाय व्यवसाय १८ कोटी रुपयांवरून २७ कोटी रुपयांवर गेला असताना व्यवस्थापनाने देऊ केलेली वेतनवाढ नगण्य आहे.

– देविदास तुळजापूरकर, संघटक, ‘यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स’ (महाराष्ट्र)