14 October 2019

News Flash

नजीकच्या काळात बँकिंग फंडातील गुंतवणूक ठरेल नफाक्षम – विश्लेषकांचा कयास

वर्ष २०१५ ते २०१८ दरम्यान गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ दिसली आहे.

मुंबई : ‘आयएल अँड एफएस’च्या पतनानंतर गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांची रोकड सुलभता आटली असून, परिणामी त्यांचे कर्ज वितरणही कमी झाले आहे. कर्ज वितरणातील ही पोकळी स्टेट बँकेसारख्या मोठय़ा बँका भरून काढत असल्याने नजीकच्या काळात बँकांच्या नफा क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे बँकिंग समभागांवर केंद्रित म्युच्युअल फंडांची कामगिरीही चांगली राहण्याची शक्यता आहे.

कर्ज वितरणाचा मोठा हिस्सा दोन-तीन वर्षांपूर्वी बँकांकडून गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांनी आक्रमकरीत्या काबीज केला होता. त्याउलट काही अपवाद वगळता बहुतांश गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणात मगील सहा महिन्यांत घट झाली आहे. तर वाणिज्य बँकांचे सुधारत असलेले कर्ज वितरण पाहता, बँकांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर फंडांतील गुंतवणूक नजीकच्या काळाला नफा मिळवून देण्याची शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

वर्ष २०१५ ते २०१८ दरम्यान गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ दिसली आहे. आयएल अँड एफएसचा घोटाळा उघडकीस आल्यापासून मात्र गैरबँकिंग वित्तीय कंपन्यांचे मूल्यांकन रोडावले. दुसऱ्या बाजूला सरकारी बँकांच्या पुनर्भाडवलीकरणानंतर बँकांच्या कर्ज वितरणात वाढ झाल्याचे दिसून येते.

अनेक असंघटित क्षेत्रातील व्यापारी आणि उत्पादक संघटित क्षेत्रात आल्याचे वस्तू आणि सेवा कराच्या महसुलातील ताज्या वाढीतून दिसून आले आहे. हे व्यापारी आणि उत्पादक आजपर्यंत खेळत्या भांडवलासाठी किंवा व्यवसायवृद्धीसाठी बँकांच्या कर्ज वितरणास पात्र नव्हते. आता संघटित क्षेत्रात आल्यामुळे ते कर्जासाठी बँकांशी संपर्क साधताना आढळत आहेत. ही लहान रकमेची आणि कमी जोखमीची कर्जे असल्याने बँकासुद्धा अशा नवीन कर्जदारांना प्राथमिकता देत आहेत. या सर्व बदलांचा परिणाम बँकिंग फंडातील समभागांच्या मूल्यांकनावर होत असून या फंडातील गुंतवणूक लाभदायक ठरण्याची शक्यता फंड विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.

First Published on May 9, 2019 3:29 am

Web Title: banking fund investment will be profitable