News Flash

बँक घोटाळ्यात एक लाख कोटी रुपयांचा चुराडा

सरलेल्या पाच वर्षांमध्ये बँकांमध्ये घोटाळ्याची २३,००० प्रकरणे घडून आली

संग्रहित छायाचित्र

सरलेल्या पाच वर्षांमध्ये बँकांमध्ये घोटाळ्याची २३,००० प्रकरणे घडून आली, ज्यायोगे तब्बल १ लाख कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाले, अशी माहिती भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेनेच दिली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सीच्या उघडकीस आलेल्या महाघोटाळ्यांची चौकशी तपास यंत्रणांकडून सुरू असताना पुढे आलेली ही संकलित आकडेवारी खासच लक्षणीय आहे.

माहिती अधिकारात आलेल्या अर्जावर खुलासा करताना रिझव्‍‌र्ह बँकेने ही अद्ययावत आकडेवारी दिली आहे. एप्रिल २०१३ ते १ मार्च २०१८ अशा पाच वर्षांत बँकांचे १,००,७१८ कोटी रुपये हे घोटाळे आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या २३,८६६ प्रकरणातून लयाला गेल्याचे त्यातून स्पष्ट होते. उल्लेखनीय म्हणजे एप्रिल २०१७ ते १ मार्च २०१८ हा बँकांसाठी सर्वाधिक घोटाळ्याचा काळ राहिला आहे. या काळात ५,१५२ प्रकरणांमध्ये बँकांच्या २८,४५९ कोटी रुपयांचा चुराडा झाला. आधीच्या २०१६-१७ वर्षांत हे प्रमाण ५,०७६ प्रकरणांतून २३,९३३ कोटी रुपये असे चढेच होते असे या आकडेवारीवरून दिसून येते.

वर्ष २०१३-१४ मध्ये सर्वात कमी १०,१७० कोटी रकमेची ४,३०६ प्रकरणे, २०१४-१५ मध्ये १९,४५५ कोटी रुपयांची ४,६९३ प्रकरणे तर २०१५-१६ मध्ये १८,६९८ कोटी रकमेची ४,७०० प्रकरणे असा गत काही वर्षांतील घोटाळ्यांचा चढता क्रम सुरू असल्याचे रिझव्‍‌र्ह बँक सांगते. ही सर्व प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि त्यानंतर त्या संबंधाने प्रक्रियेनुरूप कारवाई केली गेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरलेल्या वर्षांतील बँक घोटाळ्यांमध्ये, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा पंजाब नॅशनल बँकेतील १३,००० कोटींचा महाघोटाळा, एअरसेलच्या माजी प्रवर्तकांचा आयडीबीआय बँकेतील ६०० कोटींचा कर्ज घोटाळा, याशिवाय अन्य काही बँकांमध्ये कर्ज घोटाळ्यांची मालिका प्रकाशात आली आहे.

घोटाळेग्रस्त बँकांमध्येच सर्वाधिक बुडीत कर्जे

घोटाळेग्रस्त म्हणून नावे आलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा या बँका स्टेट बँकेनंतर सर्वाधिक बुडीत कर्जे (एनपीए) असलेल्या बँका आहेत. पीएनबीची बुडीत कर्जे डिसेंबर २०१७ अखेर ५५,२०० कोटी रुपयांची, आयडीबीआय बँक- ४४,५४२ कोटी, बँक ऑफ इंडिया – ४३,४७१ कोटी आणि बँक ऑफ बडोदा- ४१,६४९ कोटी रुपये असे बुडीत कर्जाचे प्रमाण आहे. लोकसभेत अर्थराज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बँकांचे एकूण बुडीत कर्ज डिसेंबर २०१७ अखेर ८,४०,९५८ कोटी रुपयांवर गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:31 am

Web Title: banking scam in india
Next Stories
1 ‘जीएसटी’ संकलन एप्रिलमध्ये १ लाख कोटींवर
2 वाढीव वाहन विक्रीने नववित्त वर्षांरंभ!
3 एल अ‍ॅण्ड टीच्या विद्युत व्यवसायाची श्नायडर इलेक्ट्रिकला विक्री
Just Now!
X