मुंबई : सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी मंगळवारपासून सुरू असलेल्या कामगार संघटनांच्या ‘भारत बंद’मधील बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने बँकांचे व्यवहार बुधवारीही विस्कळीतच राहिले. परिणामी, बँक खातेदार, ग्राहकांना याचा फटका बसला.

देशातील आघाडीच्या १० संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ व ‘बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया’ या दोन संघटनाही सहभागी झाल्या. परिणामी, संघटनेचे सदस्य असलेल्या मुख्यत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुंबईतील विविध शाखांमध्ये  कर्मचाऱ्यांची बुधवारीही तुरळक उपस्थिती दिसून आली. परिणामी सर्वसामान्यांच्या बँकांमधील दैनंदिन व्यवहारांचा खोळंबा झाला.

‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचेलम यांनी, दोन दिवसांच्या बंदमुळे मोठय़ा प्रमाणात रोखीचे तसेच परकीय चलन विनिमय व्यवहार विस्कळीत झाले असून ंमंगळवारी एका दिवसांत देशभरातून २०,००० धनादेश वटवता आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेतील कर्मचारी संघटनेने केवळ एक दिवसाच्या बंदला आणि तेही फक्त बाहेरून पाठिंबा दिला होता. तर स्टेट बँकेतील कर्मचारी संघटना बंदमध्ये सहभागी झाली नसल्याने तिच्यासह काही सरकारी बँकांचे कामकाज मात्र सुरळीत होते. तसेच दोन दिवसांच्या बंदमध्ये खासगी, विदेशी बँकांचाही सहभाग नव्हता. तरीही संपाला खासगी तसेच विदेशी बँकांतील कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असा दावा, संघटनेच्या राज्यातील नेत्यांनी केला आहे.