आपल्या बँकेचे ग्राहक नसलेल्या वा रोखीने कर भरणाऱ्या करदात्यांचा कर भरणा स्वीकारण्यास राष्ट्रीयीकृत बँकाच्या अलिबागमधील शाखांमध्ये नकार दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. याबाबत अलिबाग येथील सनदी लेखापाल यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे तक्रार केली होती. यानंतर अलिबागमधील ८ बँकांनी कर भरणा स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे.  केंद्र सरकारने विविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वसुलीचा भरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना प्राधिकृत केले आहे. यामध्ये आयकर, स्रोतकर, सेवाकर, मालमत्ता स्रोतकर कपात व इतर करांचा समावेश आहे, परंतु अलिबागमधील राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखांना हा नियम लागू नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात होता. कारण या बँकांकडून ग्राहक नसलेल्या वा रोखीने कर भरणाऱ्या करदात्यांचा कर भरणा स्वीकारण्यास नकार दिला जात होता अथवा टाळाटाळ करीत होती. त्यामुळे सामान्य करदात्याचे नसता मनस्ताप सहन करावा लागत होता.

याबाबतची तक्रार सनदी लेखापाल यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे केली होती. यानंतर अलिबागमधील आठ बँकांना कर वसुलीसाठी प्राधिकृत करण्यात आले असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय आणि एचडीएफसी या बँकांचा समावेश असणार आहे. तरी ग्राहकांना कर वसुली भरण्यासंदर्भात काही अडचणी अथवा तक्रारी असतील त्यांनी महाव्यवस्थापक, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, ग्राहक तक्रार निवारण विभाग, बेलापूर नवी मुंबई यांच्याशी संपूर्ण तपशिलासह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने पत्राद्वारे हा खुलासा केल्याचे सनदी लेखापाल संजय राऊत यांनी सांगितले.