क्षेत्रीय म्युच्युअल फंडांपैकी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक परतावा दिल्याचे दिसत आहे. २४ मार्च ते २४ जून या कालावधीत ‘एस अँण्ड पी बीएसई बँकेक्स’ने २३.७८ टक्के परतावा दिला आहे.

बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक करणारे १३ फंड उपलब्ध असून या काळात सर्वोत्तम फंड परतावा २९ टक्के तर सर्वात कमी १९ टक्के परतावा दिला आहे. देश कोविड-१९ च्या विळख्यात सापडल्यावर प्रमुख निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. मागील एका वर्षांत निर्देशांकात ३० टक्क्यांहून अधिक घसरण होऊनदेखील ‘कोविड’ग्रस्त बाजारात बँकिंग क्षेत्रात आशादायक वातावरण असल्याचे मानले जाते.

नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेत नाटय़मय घडामोडींची आशा नसली तरी बँकिंग क्षेत्राने गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. गेल्या एक महिन्यात बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये तेजी दिसून आली. जागतिक रोगसाथीमुळे नोकरकपात होण्याचा धोका आहे. याचा परिणाम बँकांनी कर्ज दिलेल्या हप्त्यांवर होणार असल्याने बँकिंग क्षेत्रात नकारात्मकतेची अपेक्षा होती. बँकिंग क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा आरसा असल्याने करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात बँकिंग क्षेत्र सर्वाधिक बाधित क्षेत्र होते.

मार्च अखेरीला रिझव्‍‌र्ह बँकेने कर्ज हप्त्यांना स्थगिती दिल्यानंतर बँकांचे हप्ते थकल्याने बँकांची कर्जे अनुत्पादित होण्यापासून वाचली असल्याचे मानण्यात येते. आज तरी बँका अतिरिक्त जोखीम स्वीकारण्याच्या स्थितीत नाहीत. बँकिंग आणि विशेषत: कर्जाची मागणी देशाच्या अर्थवृद्धीच्या अपेक्षेवर अवलंबून असते. सप्टेंबरपासून बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा झाली आहे. लॉकडाऊन पश्चात सर्वात सुमार टप्पा एप्रिल – जून तिमाहीचा होता आणि मार्च – एप्रिलची तिमाही आता मागे पडल्याने गुंतवणूकदारांच्या बँकांबाबतच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे.

गुंतवणूकदारांनी बँकिंग क्षेत्रातील फंडात गुंतवणुकीबद्दल सतर्क असले पाहिजे, असे सांगितले जाते. पाच वर्षांच्या दृष्टिकोनातून बँकिंग क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध आहेत. परंतु दरम्यानच्या काळात बाजारात मोठी अस्थिरता राहील, असेही नमूद केले जाते. लार्ज कॅप किंवा मल्टी कॅप फंडात सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असल्याने अशा परिस्थितीत जोखीम क्षमता कमी असलेल्या लहान गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडाद्वारे गुंतवणूक करणे कधीही योग्य असल्याचे म्युच्युअल फंड विश्लेषकांचे म्हणणे आहे.

..तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी सकारात्मक

बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राला ‘यू’ आकाराच्या पुनप्र्राप्तीची अपेक्षा  आहे. विकासवेग राहिला तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी निश्चितच ते सकारात्मक ठरेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्थितीबाबत चिंता असूनही अनेक बँकांसमोर वाढत्या अनुत्पादित कर्जाची समस्या आहे. घसरणीनंतर बँकिंग क्षेत्रात आकर्षक मूल्यांकनावर गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाल्याने परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बँकांच्या समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने बँकांच्या समभागांच्या किमतीत मोठी वृद्धी झाल्याचा फायदा बँकिंग क्षेत्रीय फंडांना झाल्याचे दिसत आहे.