करोना विषाणूने वाढत्या मृत्युसंख्येबरोबरच तमाम अर्थव्यवस्थेला खीळ बसली असतानाच आता भारताच्या विकास दराबाबतचे घसरते अंदाजही व्यक्त होऊ लागले आहेत. ठप्प पडलेल्या व्यवहारांमुळे देशाचा विकास दर चालू तसेच येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांतही उतरेल, असा कयास आघाडीच्या पतमानांकन तसेच वित्त, बँक व दलालीपेढय़ांनी बांधला आहे.

अमेरिकी मूडीजने २०२० या वर्षांसाठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाण २.५ टक्के असेल असे म्हटले आहे. अमेरिकी वित्तसंस्थेचा यापूर्वीचा अंदाज चालू वर्षांसाठी ५.३ टक्के होता.

इक्राच्या अंदाजानुसार, १ एप्रिल २०२० पासून सुरू होणाऱ्या वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर अवघा ४.५ टक्के अभिप्रेत केला आहे. तर पुढील एकूण वित्त वर्षांत हा दर २ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

क्रिसिलने २०२०-२१ मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन ३.५ टक्के असेल, असे म्हटले आहे. यापूर्वीचा अंदाजित दर ५.२ टक्के होता. यंदा मान्सून योग्य प्रमाणात झाला तर विकास दर काही प्रमाणात सावरेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मूडीज : २.५% (२०२०)

इक्रा : २% (२०२०-२१)

क्रिसिल : ३.५% (२०२०-२१)