टाळेबंदीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांचे व्यवसाय अडचणीत आले असून अनेकांकडे खेळत्या भांडवलाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बँकांकडे छोटी कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र बँका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकडून मुद्रांक (स्टँप पेपर) मागत आहेत. प्रत्यक्षात मुद्रांकांची विक्री थांबविण्यात आली असून अशा परिस्थितीत साध्या कागदावर घेतलेले हमीपत्रदेखील ग्राह्य़ धरले जाऊ  शकेल. त्यामुळे टाळेबंदीत छोटी कर्ज मागणाऱ्या व्यावसायिकांना एकप्रकारे दिलासाच मिळू शकतो, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

टाळेबंदीत छोटी कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. सोने तारण घेऊन कर्ज मागितले जात आहे. त्यासाठी काही बँकांकडून ज्यांना तारण किंवा अन्य प्रकारचे कर्ज हवे असेल त्यांना मुद्रांकावर व्यवहाराची हमी देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

एका कर्जदाराने या अटीबाबतची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

याबाबत राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय प्रमुख आणि विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, की एखाद्याला मोठय़ा रकमेचे कर्ज हवे असेल तर बँकांकडून हमी घेतली जाते. तारण कर्जापोटी कुलमुख्यत्यारपत्र तयार करून घेतले जाऊ  शकते. प्रत्येक अडचणीवर बँकांकडे मार्ग असतो. बँकांनी मनात आणले तरी साध्या कागदावर हमी घेतली जाऊ शकते. टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा मुद्रांक उपलब्ध होतील. त्यानंतर मुद्रांकावर कर्जदाराकडून हमी घेतली जाऊ शकते. तूर्तास साध्या कागदावर कर्जदाराकडून हमी घेतली जाऊ शकते. सोने तारण ठेवताना सोने खरेदीची पावती ग्राह्य़ धरली जाऊ शकते. सोन्याची मालकी दाखविली तर बँका त्वरित साध्या कागदावर हमी घेऊन कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात.

बँकांकडे प्रत्येक अडचणीवर मार्ग आहे. कर्जदाराने बँकेकडे विचारणा किंवा पत्र दिल्यानंतर अडचणीतून मार्ग  काढणे शक्य होते. त्यासाठी कर्जदाराची अधिकृत विचारणा केली तर पुढील मार्ग निघू शकतो.

अनेकांनी बँकांकडून व्यावसायिक कर्ज, गृहकर्ज, वाहन, वस्तू खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. गेले दीड महिने व्यवसाय बंद आहेत. व्यावसायिकांकडे खेळत्या भांडवलाची अनुपलब्धता आहे. कामगारांचे पगार द्यायचे आहेत, अशा अनेक अडचणींना व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या सूचनेनंतर व्यावसायिक कर्जदारांना रोखपत मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. रोखपत मर्यादा २५ टक्कय़ांनी वाढवून देण्यात आली आहे. रोखपत मर्यादा वाढवून दिल्याने त्यांचे खाते अनुत्पादक (एनपीए) म्हणून नोंद होणार नाही.

ज्यांना थकीत हप्ते एकदम भरणे शक्य नाही, ते हप्ते बांधून देऊ  शकतात. ज्यांचे पगार सुरू आहेत; मात्र टाळेबंदीमुळे काहींच्या पगारात कपात झाली आहे अशा कर्जदारांनी बँकांना पत्र दिले तर त्यांचे हप्ते कापले जाऊ  शकत नाही. फक्त त्यासाठी कर्जदाराने बँकांना याबाबतची माहिती एका पत्राद्वारे देणे गरजेचे आहे, असे अनास्कर यांनी नमूद केले.

बँका अडचणीत मार्ग काढून कर्जदारांना दिलासा देऊ शकतात. रिझव्‍‌र्ह बँकेने काही सूचना बँकांना दिल्या आहेत. फक्त कर्जदाराने बँकांकडे मागणी केली पाहिजे. तसे पत्र दिले तर बँका पुढील अडचणीतून मार्ग काढून कर्जदारांना दिलासा देण्यासाठी प्रय करू शकतात.

— विद्याधर अनास्कर, प्रशासकीय प्रमुख, राज्य सहकारी बँक व अध्यक्ष, विद्या सहकारी बँक